नंदुरबार मिळवतोय ‘सिकलसेल’ आजारावर नियंत्रण

By Admin | Published: February 4, 2017 08:35 AM2017-02-04T08:35:07+5:302017-02-04T08:49:23+5:30

कुपोषणानंतर सिकलसेल अ‍ॅनिमिया आरोग्य विभागाच्या अजेंड्यावर आहे. आधुनिक आणि मोफत उपचारांमार्फत सिकलसेलवर नियंत्रण मिळवले जात आहे.

Nandurbar is taking control of 'sickle cell' disease | नंदुरबार मिळवतोय ‘सिकलसेल’ आजारावर नियंत्रण

नंदुरबार मिळवतोय ‘सिकलसेल’ आजारावर नियंत्रण

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत/मनोज शेलार  

नंदुरबार, दि. 4 - प्रशासन आणि विविध सेवाभावी संस्थांनी सिकलसेल अ‍ॅनिमियाबाबत एक ना अनेक उपक्रमातून जनजागृतीची मोहीम राबविल्याने सिकलसेलबाबत लोकचळवळ सुरू झाली आहे. शिवाय आधुनिक उपचार पद्धतीही अंमलात आल्याने सिकलसेल आवाक्यात येत असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सध्या चार हजार ९० जण या आजाराचे रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा रुग्णालयासह सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपचार होत आहेत.
 
 
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यूच्या समस्येनंतर सिकलसेल या आजाराचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गंभीर झाला होता. विशेषत: आदिवासींमध्ये या आजाराची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून विशेष कृती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सिकलसेल नियंत्रण सोसायटी आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीवर भर देऊन मोफत उपचार करण्यात येत आहे.
 
 
सर्वसामान्य व्यक्तीमध्ये सामान्य लाल रक्तपेशी वाटोळ्या आकाराच्या असतात. तर सिकलसेलमध्ये लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या असतात. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमात मोफत रक्त तपासणी केली जाते. शिवाय अशा रुग्णांना मोफत समुपदेशन, औषधोपचार व संदर्भ सेवा पुरविली जात आहे. जिल्हा रुग्णालयातदेखील मोफत रक्त संक्रमण केले जाते.
सर्वाधिक रुग्ण हे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आहेत.
 
गेल्या सहा वर्षात करण्यात आलेल्या विविध केंद्रातील तपासणीनुसार एकूण ३५ हजार ३५६ वाहक तर चार हजार ९० जण या आजाराने ग्रस्त आहेत. नंदुरबार तपासणी केंद्रात २१ हजार १०७ जणांची रक्त तपासणी केली असता सहा हजार ८८२ वाहक व एक हजार १२१ सिकलसेलग्रस्त आढळून आले. धडगाव तपासणी केंद्रात सहा वर्षात १२ हजार ८२१ जणांची रक्त तपासणी केली असता आठ हजार २०२ जण सिकलसेल वाहक तर ८४४ जणांना त्याची पूर्णपणे लागण झाली आहे. अक्कलकुवा केंद्रात सात हजार ६०४ जणांची रक्त तपासणी करण्यात आली असता पाच हजार ३३८ जण वाहक तर ७१८ जण सिकलसेल ग्रस्त आढळले.
 
म्हसावद तपासणी केंद्रात नऊ हजार १०० जणांची रक्त तपासणी केली असता पाच हजार ५३ जण वाहक तर ४२३ जण ग्रस्त आढळले. नवापूर केंद्रात १३ हजार ७५८ जणांची तपासणी केली असता नऊ हजार ८८१ जण वाहक आढळले तर ९८४ जण सिकलसेलग्रस्त आढळले असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

 

आधुनिक पद्धतीने केले जातात उपचार
४सिकलसेलच्या सर्व रुग्णांना फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या मोफत पुरविल्या जातात. वेदनाशामक औषधी दिली जातात. जंतूसंसर्ग झाल्यास अँटीबायोटिक देऊन उपचार केले जातात. गुंतागुंतीच्या रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयात हलविले जाते. रक्त संक्रमणाची गरज असणाऱ्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात रक्तसंक्रमणाची सोय करून दिली जाते. सर्व रुग्णालयात स्वतंत्र औषधे पुरविण्यात येतात.

 

सिकल सेल म्हणजे काय?
सिकल सेल या आजारात रक्तातील तांबड्या पेशी गवत कापण्याच्या विळ्यासारख्या आकाराच्या होऊन त्या लवकर फुटतात. त्यामुळे रक्तक्षय म्हणजे ‘सिकल सेल अॅनिमिया’ होतो. राज्याच्या 19  जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने दुर्गम भागांतील आदिवासी जमातींमध्ये हा आजार आढळतो.
 
सिकल पेशींचा आजार हा आजार सिकल पेशी रक्तक्षय किंवा ड्रेपॅनोसायटोसिस या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. तांबड्या रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. तांबड्या रक्तपेशीतील हीमोग्लोबिन जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशीचा आकार बदलतो. सिकलसेल आजार हा आनुवांशिक असून माता-पित्याकडून त्यांचा अपत्याला होतो.
 

 

Web Title: Nandurbar is taking control of 'sickle cell' disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.