नापिकीमुळे शेतकऱ्यांनी गावच काढले विक्रीला !
By admin | Published: July 20, 2015 12:44 AM2015-07-20T00:44:14+5:302015-07-20T00:44:14+5:30
मागील तीन वर्षांपासूनच्या सततच्या नापिकीला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील वाघोडावासीयांनी थेट गावच विक्रीला काढले आहे. सरकारने शेती करावी
कारंजा (वर्धा) : मागील तीन वर्षांपासूनच्या सततच्या नापिकीला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील वाघोडावासीयांनी थेट गावच विक्रीला काढले आहे. सरकारने शेती करावी, आम्ही मजुरी करू, असे आव्हानच शेतकऱ्यांनी दिले आहे.
२१ जूनपासून पावसाने पाठ फिरवल्याने गावातील ७० टक्के पिके करपली आहेत. वाघोडाचे सरपंच, उपसरपंचासह गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावच विकायला काढले आहे. इतकेच नव्हे, १०२ शेतकऱ्यांनी शासनाकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे.
शासनाचा प्रतिनिधी गावात येईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गावातील ९५ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतीशिवाय रोजगाराचे दुसरे साधन नाही. गेल्या तीन वर्षांतील नापिकीमुळे गावातील बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतीतून काही उत्पन्न नाही आणि डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने गावक-यांनी हा निर्णय घेतला.
राजकीयदृष्ट्या वाघोडा गावात ८० टक्के भाजपाचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीत भाजपा आघाडीचीच सत्ता आहे. मात्र कोणीही पुढारी गावाकडे फिरकलेला नाही. (प्रतिनिधी)