उरणमध्ये सोन्याचा मुलामा असलेला नारळ समुद्राला अर्पण करून केला नारळी पौर्णिमा उत्सव साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 09:21 PM2021-08-22T21:21:51+5:302021-08-22T21:22:36+5:30
मधुकर ठाकूर उरण : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यावर्षीही करंजा- मोरा येथील कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला.यावेळी कोळी बांधवांनी ...
मधुकर ठाकूर
उरण : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यावर्षीही करंजा- मोरा येथील कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला.यावेळी कोळी बांधवांनी सोन्याचा मुलामा असलेला नारळही समुद्राला अर्पण केला.
मागील अनेक वर्षांपासून नारळी पौर्णिमेचा सण करंजा- मोरा येथील मच्छीमार पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरा करतात.करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलमध्ये नारळाच्या प्रतिकृतीला सोन्याचा मुलामा देऊन सजविण्यात येते. यावेळी महिला, कोळी बांधव,विद्यार्थी पारंपारिक कोळी वेशभुषा परिधान करून उत्सवात सामील होतात.पारंपारिक कोळी गाण्यांवर नृत्य सादर करतात.पारंपारिक कोळी संस्कृतीचे दर्शन घडवितात.त्यानंतर नारळाच्या प्रतिकृतीची नाचतगात मिरवणक काढतात.समुद्र किनाऱ्यावर नारळाची मोठ्या भक्तिभावाने पुजन करतात.सागराची यथासांग पूजा करून नारळ नौकेतुन समुद्राला अर्पण केला जातो.
मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाच्या पाश्र्वभूमीवर सर्वच उत्सवांवर निर्बंध आले आहेत. तरीही करंजा येथील मच्छीमारांनी करोना नियमांचे पालन करीत नारळी पौर्णिमा साजरी केली. मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत सोन्याचा मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण करण्यात आला. याप्रसंगी करंजा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन भालचंद्र कोळी, देवेंद्र कोळी, सिद्धेश कोळी, करंजा मच्छीमार संस्थेचे माजी अध्यक्ष के.एल.कोळी, माजी उपाध्यक्ष महेंद्र नाखवा,करंजा विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा आदी मान्यवर सहभागी झाले होते.