सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 06:04 PM2020-02-18T18:04:07+5:302020-02-18T18:13:04+5:30
Narayan Rane : राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणाच्या दौऱ्यावर गेले होते.
सिंधुदुर्ग - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामधून कोकणाला काय मिळाले, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडी येथील जत्रेस जात भराडीदेवीचे दर्शन घेतले. तसेच कोकणातील विकासकामांचा आढावा घेत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मात्र उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर नारायण राणे यांनी टीका केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी अन् सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजना, मुख्यमंत्र्यांची घोषणा
...अन् शिवसैनिकाच्या मदतीला धावले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ह्या शिवसेनेचा नेमक्या चल्ला तरी काय? उद्धव ठाकरेंचा नाणारला विरोध; शिवसैनिकांचं मात्र समर्थन
''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील विकासकामांसाठी कुठलाही निधी देण्याची घोषणा केलेली नाही. सी वर्ल्ड प्रकल्पाला एकेकाळी शिवसेनेने विरोध केला होता. मात्र आता त्या प्रकल्पाची बांधणी खासगी गुंतवणुकीतून करण्याची तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी कोकणाबाबत माहिती घेतली पाहिजे. चिपी विमानतळाच्या कामाबाबत राज्य सरकार कमी पडत आहे. त्यांच्या आजच्या कोकण दौऱ्यातून कोकणाला काय मिळाले हा प्रश्नच आहे. सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असे नारायण राणे म्हणाले. तसेच खासदार म्हणून मुख्यमंत्र्यांना मदत करण्यास कधीही तयार असल्याचेही राणेंनी सांगितले.
दरम्यान, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही मोठे भाकीत केले आहे. भाजपा राज्यातील सरकार जेव्हा पाडायचे तेव्हा पाडणार, त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आव्हान देण्याची गरज नाही. सध्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. काल रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांच्या कृतीमधून हा असंतोष दिसला होता. एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, '' असे भाकीतही राणेंनी केले.