शिवसेनेत निष्ठावंताना डावलून 'उपऱ्याना' संधी: नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 12:39 PM2020-01-12T12:39:41+5:302020-01-12T12:43:42+5:30
राज्यात नव्याने महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाली असून शिवसेनेच्या वाट्याला 12 मंत्रीपद आली आहेत.
मुंबई : मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने शिवसेनेत मोठ्याप्रमाणावर नाराजी असल्याचे समोर आले होते. तर याच मुद्यावरून भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेतील निष्ठावंताना डावलून उपऱ्याना संधी देण्यात आली असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
'या मंत्रीमंडळात, ज्यांनी सेनेसाठी कष्ट केले असे खरेखुरे शिवसैनिक केवळ दोन मंत्री आहेत. मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांना पकडून चार. बाकी सर्व उपरे घेतलेले, त्यांना कोणीही विचारत नाही. जर महाराष्ट्राचे राज्यकर्ते असे असतील, तर जनतेने कोणाकडे पहावे'? असा टोला राणेंनी शिवसेनेला लावला आहे.
राज्यात नव्याने महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाली असून शिवसेनेच्या वाट्याला 12 मंत्रीपद आली आहेत. त्यातील 10 कॅबिनेट मंत्रीपद तर 2 राज्यमंत्रीपद आहे. यामध्ये नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आली असून गेल्यावेळी मंत्रीपद असलेल्या अनेकांना डच्चू देण्यात आला आहे.