'एक शरद अन् शिवसेना गारद', पवारांच्या मुलाखतीवरून नारायण राणेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 03:45 PM2020-07-10T15:45:03+5:302020-07-10T17:31:36+5:30
कोकणात मुंबईकरांमुळे कोरोना व्हायरस वाढला, असे नारायण राणे म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक विशेष मुलाखत लवकरच पाहायला मिळणार आहे. ही मुलाखत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय राऊत यांनी मुलाखतीच्या प्रोमोला 'एक शरद, सगळे गारद' अशी टॅगलाईन दिली आहे.
यावरून सध्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राजकारणात शरद पवार यांच्यासमोर कोण गारद? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एक शरद आणि शिवसेना गारद असा शाब्दिक टोला शिवसेनेला लगावला आहे.
याशिवाय, मुलाखतीसाठी शिवसेनेकडे माणसंच नाही आहेत. त्यामुळे शरद पवारांना घेतले असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. तसेच, पहिली ज्यांची मुलाखत यायची ती माहीत गोळा केलेली असायची. यामध्ये स्वत:चे विचार, माहिती असे काय आहे? असा प्रश्न त्यांनी शिवसेनेला केला आहे. त्याचबरोबर, मुलाखतीत शरद पवार जे बोलतील ते राज्याच्या हिताचे असेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, कोकणात मुंबईकरांमुळे कोरोना व्हायरस वाढला, असे नारायण राणे म्हणाले. तसेच, गणेशोत्सवासाठी कोकणात जायला कोकणी माणसाला बंदीचा आदेश निघालेला नाही. जर बंदीचा आदेश आला तर तीव्र आंदोलन करु, अशा इशारा यावेळी नारायण राणे यांनी दिला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या मुलाखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये या मुलाखतीमधील काही प्रश्न पवारांची उत्तरं पाहायला मिळणार आहे. ही मुलाखत ११, १२ आणि १३ जुलैला पाहता येणार आहे.
विशेष म्हणजे, 'ही राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल.' असा दावा स्वत: संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट देखील केले आहे. या मुलाखतीत शरद पवार हे चीनपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीवर जोरदार बोलले असल्याचेही संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुलाखतीत शरद पवार नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
आणखी बातम्या...
मोफत धान्य, मजुरांना भाड्याचे घर...; मोदींच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
मी कोरोना चाचणी केली, होम क्वारंटाईन होतोय - अमोल कोल्हे
खबरदार, पालकांकडून फी मागाल तर... ; 'या' राज्य सरकारचा खासगी शाळांना सज्जड इशारा
"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"
CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...
हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य