राज्यसभा निवडणूक: भाजपाकडून शिवसेनेचा पराभव; नारायण राणे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 04:10 PM2022-06-11T16:10:05+5:302022-06-11T16:11:39+5:30
शिवसेनेच्या संजय पवारांचा भाजपाने केला पराभव
Narayan Rane vs Shivsena Rajya Sabha Election 2022: महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाची सरशी झाली. सहापैकी पाच जागांवर आमदारांचा विजय निश्चित होता. पण सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपा यांनी उमेदवार दिला. त्यामुळे त्यांच्यात थेट लढत रंगली होती. मतदान पार पडल्यानंतर काही तांत्रिक बाबी पाहून अखेर मध्यरात्री ४ च्या सुमारास निकाल लागला आणि त्यात भाजपाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर विजय मिळवला. शिवसेनेच्या पराभवानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट केले.
राणे काय म्हणाले...
"राज्यसभा निवडणुकीत राज्यात सहाव्या जागेमुळे रंगतदार झालेल्या वातावरणात भाजपाने तिसऱ्या जागेवरही विजय मिळवला हे विशेष आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे हे यश आहे. पियूष गोयल, धनंजय महाडिक आणि डॉ. अनिल बोंडे या सर्व विजयी उमेदवारांचे तसेच चंद्रकांतदादा व देवेंद्रजी यांचे खूप अभिनंदन. यासोबतच, त्यांनी राज्यसभा निवडणूक असा टॅग मार्क केला.
सर्व विजयी उमेदवारांचे व चंद्रकांत दादा व देवेंद्रजी यांचे खूप अभिनंदन. @PiyushGoyal@dbmahadik@DoctorAnilBonde#RajyaSabhaElections2022
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 11, 2022
नारायण राणे शिवसेनेच्या पराभवावर किंवा संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काय बोलणार याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. पण त्याबाबत त्यांनी काहीही विधान केले नाही.
भाजपाच्या विजयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले-
"राज्यसभेच्या लढाईत भाजपाने बाजी मारली. पण ही छोटी लढाई होती. मोठी लढाई अजून बाकी आहे. येत्या काळात सगळीकडे या सरकारला दणके देऊ. २०२४ ला भाजपा केंद्रात आणि राज्यात सरकार आणेल, यावर मला विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्साह कायम ठेवा. आता सुरूवात झाली आहे. राज्यात आणि मुंबई पालिकेवर भाजपाचा भगवा लावायचाय हे लक्षात ठेवा", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"भाजपा जिंकल्याने काहींच्या तोंडचं पाणी पळालं तर काही पिसाटले आहेत. पण जिंकल्यावर नम्रता सोडायची नसते, त्यामुळे जल्लोष करा पण उन्माद नको. शिवसेनेला कोणी मतं दिली नाहीत हे त्यांना खरंच माहिती असेल, तरीही ते काही करु शकत नाहीत. कारण भाजपाला मदत करणाऱ्यांवर जर त्यांनी कारवाई केली तर महाविकास आघाडीतील अनेक जण त्यांना सोडून जातील", असा इशाराही फडणवीसांनी दिला.