'उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही', चिपी विमानतळावरुन वाद पेटणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 08:00 PM2021-09-07T20:00:13+5:302021-09-07T20:03:06+5:30
Narayan Rane on uddhav thackeray: चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन राणे विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग: काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त विधानानंतर राणे विरुद्ध शिवसेना असा वाद राज्याला पाहायला मिळाला होता. आता चिपी विमानतळावरुन हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. लवकच सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी नारायण राणेंना प्रश्न विचारला असता, 'उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत', असं नारायण राणे म्हणाले आहेत.
नारायण राणे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर 'मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्रालयाचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही', असं राणे म्हणाले. तसेच, येत्या 9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्रेय लाटण्याचा कुणी प्रयत्न करू नये...
यावेळी त्यांनी विमानतळ त्यांच्या प्रयत्नामुळे बांधल्याचं म्हटलं. 'विमानतळाचं क्रेडिट घेण्याचा प्रश्न नाही. 2014पर्यंत मी विमानतळ बांधून घेतलं. त्याचं उद्घाटन करण्याचा आमचा अधिकार आहे. श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, जे कोणी म्हणतं आम्ही स्थानिक आहे. त्यांनी संबंधित मंत्र्यांशी बोलावं. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते मला माहीत नाही, जे परवानगी देणारे मंत्री आहेत त्यांच्याशी भेटून मी बोललो त्यांनी मला हा कार्यक्रम दिला आहे, असं ते म्हणाले.