राणे-केसरकर एकाच मंचावर! शिवसेनेच्या नेत्यांसोबत पहिल्यांदाच, सिंधुदुर्गचे राजकारण बदलतेय...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:31 PM2023-06-06T12:31:16+5:302023-06-06T12:31:52+5:30
राज्यातील राजकारणापेक्षा जिल्ह्यातील राजकारण सतत बदलत असते. त्याचे मुख्य केंद्र नारायण राणे असतात.
मुंबई : कोकण आणि नारायण राणे हे समीकरण गेली अनेक वर्षे कायम आहे. परंतू, २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून आमदार असलेल्या दीपक केसरकर यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत बंड पुकारल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय वातावरण बदलले होते. नारायण राणेंचे खासदार पूत्र यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. यानंतर केसरकर आणि राणे यांच्यात कधीच पटले नाही. जिल्हा नियोजन बैठका असोत की राजकारण केसरकर आणि राणे पिता पुत्रांमध्ये वाकयुद्धे होत राहिली. परंतू आज सिंधुदुर्गच्या राजकारणात राणे पिता-पूत्र आणि केसरकर पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आल्याचे पहायला मिळाले आहे.
राज्यातील राजकारणापेक्षा जिल्ह्यातील राजकारण सतत बदलत असते. त्याचे मुख्य केंद्र नारायण राणे असतात. नारायण राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा केसरकर राष्ट्रवादीत होते. यामुळे तेव्हा दोघांना जुळवून घ्यावे लागले होते. परंतू, नंतर केसरकरांनी राणेंविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि राणेंच्या मदतीला खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले होते. पवारांनी केसरकर यांच्या घरी जाऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु होता. सावंतवाडीत पवार, राणे यांची संयुक्त सभा होती. परंतू, तिथे केसरकर आमदार असूनही गेले नाहीत आणि सर्व वातावरण फिरले. पुढे केसरकर शिवसेनेत गेले.
केसरकर आणि राणे समर्थक यांच्यातील वाद कायम राहिला. पुढच्या विधानसभेला केसरकर निवडून आले आणि राणेंना शिवसेनेच्या वैभव नाईकांकडून पराभव पत्करावा लागला. केसरकर पालकमंत्री झाले तेव्हा देखील जिल्हा परिषदेतील बैठकांत राणे वि. केसरकर जुंपत होती. पुन्हा लोकसभा आली, विधानसभा आली. जिल्ह्याचे वातावरण बदलत राहिले. आता राणे भाजपात आहेत. तर केसरकर शिंदेंच्या सत्तांतरानंतर शिवसेनेत आहेत.
यामुळे पुन्हा एकदा राज्याचेच नाही तर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण बदलले आहे. आज सावंतवाडीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत. या मंचावर नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे देखील आहेत. महत्वाचे म्हणजे केसरकर आणि नारायण राणे यांच्या संवाद, स्मितहास्य झाल्याने जिल्ह्यातील राजकीय गणिते पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.