Narayan Rane On Shivsena: शिवसेना नेते एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल'; नारायण राणे यांनी केले सूचक वक्तव्य, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 09:53 AM2022-06-21T09:53:04+5:302022-06-21T09:54:38+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांशी बोलले.
पिंपरी :
काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काम करत नसल्याने त्यांच्या आमदारावर त्यांचा अंकुश राहिलेला नाही. म्हणूनच काँग्रेसच्या उमेदवाराचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली.
पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांशी बोलले. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत राणे यांनी विरोधकांवर टीका केली. काँग्रेसचे काय राहिले आहे, ना देशात ना महाराष्ट्रात. काँग्रेस संकुचित पावत आहे. त्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही. देशात कोणत्याही प्रकारचं काम कार्य त्यांचे कार्यकर्ते व नेते करीत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या आमदारांवर त्यांचा अंकुश नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला.
एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात?
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते भाजपच्या संपर्कात आहेत का, असे विचारले असता राणे म्हणाले, ''असं सांगायचं नसतं, मग नॉट रिचेबल राहून काय उपयोग''. महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणणार का, असे विचारले असता राणे म्हणाले, "एक दिवस तरी मुख्यमंत्र्यांना स्वस्थ काढू द्या ना".
एकनाथ शिंदेसह १३ आमदार सूरतमध्ये!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील १३ आमदार देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या गुजरातच्या सूरतमधील मेरेडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि गुजरात भाजपाच्या नेत्यांनीही शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.