नारायण राणेंनी गड राखला
By admin | Published: February 24, 2017 04:30 AM2017-02-24T04:30:57+5:302017-02-24T04:30:57+5:30
काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला
सिंधुदुर्ग : काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमधील सत्ता कायम टिकविण्यात राणेंना यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या ५0 जागांपैकी २७ जागा आणि राष्ट्रवादीची १ मिळून २८ जागा काँग्रेस आघाडीला मिळाल्या आहेत. मात्र, शिवसेना भाजपाने सिंधुदुर्गात जोरदार मुसंडी मारली असून काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेने १६, भाजपाने ६ जागा जिंकल्या आहेत. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी मतदारसंघात नगरपालिका निवडणुकीपाठोपाठ या निवडणुकीतही मतदारांनी नाकारले आहे.
जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांपैकी दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ, देवगड या चार पंचायत समित्यांवर शिवसेना आणि भाजपाने कब्जा केला असून काँग्रेसला मालवण, कणकवली, सावंतवाडीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर वैभववाडीत काँग्रेस आणि युतीच्या समान जागा निवडून आल्या आहेत. कणकवलीत आमदार नीतेश राणे यांनी १८ पैकी ११ जागा जिंकल्या आहेत. तर कुडाळ तालुक्यात शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषदेतील ९ पैकी ६ जागा आणि पंचायत समितीवर एकतर्फी भगवा फडकविला आहे. त्यामुळे मागील २0१२च्या निवडणुकीचा विचार करता सेना-भाजपाने जिल्ह्यात चांगली उभारी घेतली आहे.
सिंधुदुर्ग
पक्षजागा
भाजपा0६
शिवसेना१६
काँग्रेस२७
राष्ट्रवादी0१
इतर00