राज्यातील तणाव निवळला; तरीही पोलिसांकडून खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 10:46 AM2021-08-26T10:46:40+5:302021-08-26T10:46:58+5:30
शिवसेना-भाजपच्या कार्यालयांसमोर ठेवण्यात आलेला बंदोबस्त कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेमुळे राज्यात निर्माण झालेल्या तणावाचे वातावरण बुधावरी निवळले आहे. मात्र, तरीही शिवसेना व भाजपच्या कार्यालयांसमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कार्यकर्त्यांकडून हिंसक आंदोलनाच्या शक्यतेने ही खबरदारी घेण्यात आली आहे.
शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिह हे त्यावर लक्ष ठेवून आहेत.
राणे यांची मंगळवारी रात्री उशिरा जामीनावर सुटका झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शाब्दिक ‘वाॅर’ सुरू आहेत. मात्र, मंगळवारच्या तुलनेत तणाव कमी झाला आहे. बुधवारी दोन्ही पक्षांकडून याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले नाही.
मात्र, तरीही पोलिसांकडून दोन्ही पक्षांच्या कार्यालयांसमोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेषतः मुंबई व कोकणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.