'केसरकर हा थापेबाज,बंडलबाज माणूस': नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 11:34 AM2019-12-17T11:34:40+5:302019-12-17T11:38:09+5:30
पाचशे कोटी आणले म्हणून सांगणारे केसरकर यांची थापेबाजी आता चालणार नाही. सावंतवाडीचे आमदार केसरकर झाले हे दुर्दैव आहे, असे सुद्धा नारायण राणे म्हणाले.
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेते एकमेकांवर आरोप करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तर भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. "केसरकर हा थापेबाज, बंडलबाज माणूस" असल्याची जहरी टीका राणेंनी केली आहे.
राणे यांनी सोमवारी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर याचवेळी त्यांनी केसरकर यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. "आमदार दीपक केसरकर हे थापेबाज, बंडलबाज असून, असा माणूस जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभला हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. सावंतवाडीकरांनी अशा माणसाला निवडून देऊन स्वत:ची पीछेहाट करून घेतली" असल्याचे राणे म्हणाले.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, भुयारी गटार योजनेसारख्या नागरी सुविधा केसरकर यांच्या राजवटीत गेल्या पंचवीस वर्षात या शहराला प्राप्त झाल्या नाहीत. पाणीपुरवठा योजना, उद्यान, सांडपाणी व्यवस्थापन, नागरी सुविधा याबाबतीत केसरकर यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे अशा माणसाच्या हातात पुन्हा सत्ता देऊन शहराची पीछेहाट करण्यापेक्षा सावंतवाडी करांनी भाजप वर विश्वास दाखवावा आम्ही सावंतवाडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बांधील आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
तर आपण पाचशे कोटी आणले म्हणून सांगणारे केसरकर यांची थापेबाजी आता चालणार नाही. सावंतवाडीचे आमदार केसरकर झाले हे दुर्दैव आहे, असे सुद्धा नारायण राणे म्हणाले. तर राज्यात तीन पक्षांचे भिन्न विचारसरणीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही. बाळासाहेबांनी स्वत: पद घेतले नाही. शिवसैनिकांना नेहमी पदे दिली. मात्र उद्धव ठाकरे अपवाद ठरले असल्याचे सुद्धा राणे म्हणाले.