Narayan Rane: 'मुख्यमंत्र्यांनी यावं म्हावरं खावं, पाहुणचार करावा अन् परत जावं'; नारायण राणेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 05:21 PM2021-10-08T17:21:31+5:302021-10-08T17:22:09+5:30
Narayan Rane: शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षाचा नवा अंक उद्या सिंधुदुर्गात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षाचा नवा अंक उद्या सिंधुदुर्गात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. राणे यांनी उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चिपी विमानतळाच्या कामात शिवसेनेचा काहीच संबंध नाही. उलट यांच्या नेत्यांनी विमानतळाच्या कामांना विरोध केला, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
"विकास प्रकल्पांना आधी विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाले की श्रेय घ्यायला यायचं, ही शिवसेना नेत्यांची वृत्ती आहे. राज्याचे मुख्यमंत्री असल्यानं उद्धव ठाकरे यांनी आमच्या सिंधुदुर्गात यावं, आम्ही त्यांचा पाहुणचार करू, मालवणचं म्हावरं खावं आणि परत जावं", असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
शिवसेनेचं कोकणच्या विकासात कोणतंही योगदान नाही
शिवसेनेचं एक योगदान कोकणात दाखवा, त्यांनी केलेलं एक काम मला दाखवा, असं आव्हान नारायण राणे यांनी यावेळी केलं. चिपी विमानतळ केव्हाच बांधून तयार होतं. पण विमानतळाच्या पाण्याचा प्रश्न होता. एमआयडीसीकडे पाणी देण्याचं काम होतं. ते इतकी वर्ष का केलं नाही? चिपी विमानतळाकडे पोहोचणाऱ्या रस्त्याचा खर्च फक्त ३४ कोटी इतका होता. मग तो इतकी वर्ष का केला गेला नाही?, असं सवाल नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केले.
रस्त्यांची कामं घेतली आणि प्रत्यक्षात कामं केलीच नाहीत. त्या पैशातून फक्त नव्या नव्या गाड्या नेत्यांनी घेतल्या, असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला.
...तेव्हा विनायक राऊतांचं विमानतळाविरोधात आंदोलन
सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या होईल. १९९७-९८ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी उड्डाण मंत्री असताना ग्रीनफिल्ड विमानतळांची घोषणा केली. तेव्हा सिंधुदुर्गात विमानतळ व्हावं यासाठी मी त्यांची भेट घेऊन विमानतळ मंजूर करून घेतला. १५ ऑगस्ट २००९ रोजी भूमिपूजन झालं. त्यावेळी तिथे काही जण आंदोलन करत होते. घोषणाबाजी सुरू होती. जमीन संपादित करू नका, आम्हाला विमानतळाची गरज नाही, अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यांचं नेतृत्त्व शिवसेना खासदार विनायक राऊत करत होते. आता तेच विमानतळ आम्ही सुरू केलं म्हणत श्रेय घेत आहेत, असं राणेंनी सांगितलं.