Narayan Rane: "मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर...", सेनेला डिवचताना नारायण राणेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:26 PM2021-10-08T18:26:47+5:302021-10-08T18:27:18+5:30
Narayan Rane: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारकडून मान राखला जात नसल्याची राणेंची टीका
Narayan Rane: सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या केलं जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन सोहळा होणार आहे. त्याआधी नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. चिपी विमानतळाच्या कामात शिवसेनेनं श्रेय घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण विकास प्रकल्पांना यांच्याच नेत्यांनी याआधी विरोध केला आहे. आधी विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाले की श्रेय घ्यायला यायचं, ही शिवसेना नेत्यांची वृत्ती असल्याचं नारायण राणे म्हणाले.
राज्य सरकारनं चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवरही राणे यांनी निशाणा साधला. निमंत्रण पत्रिकेत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नसल्याचा निषेध राणे यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्याचं नाव छापलेलं नाही याबाबत फडणवीसांशीही बोलणं झाल्याचं राणेंनी यावेळी सांगितलं. फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेवरही राणेंनी मिश्किल टिप्पणी केली.
नेमकं काय म्हणाले राणे?
राज्य सरकारनं चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठीची निमंत्रण पत्रिका पत्रकार परिषदेत सादर केली. यात फडणवीसांच्या नावाचा उल्लेख नसल्याचं आणि त्यांना निमंत्रित केलं गेलं नसल्याच्या मुद्द्यावर राणेंनी भाष्य केलं. "राज्यात कायदेही आहेत आणि इथं प्रथा परंपरेप्रमाणेही राज्य चालत आलं आहे. कायद्याप्रमाणेच महाराष्ट्रात प्रथा परंपरांनाही महत्त्व आहे. राज्य सरकारचा कार्यक्रम आहे. हा काही देसाईंच्या घरचा कार्यक्रम नाही. त्यांच्या मुलाच्या लग्नाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आलं आहे. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचंही नाव हवं होतं. त्यांचाही मान ठेवला गेलाच पाहिजे. पण तो ठेवला गेला नाही. त्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद नसली तरी या सरकारची निती काय आहे हे जनतेला यातून कळालं आहे", असं नारायण राणे म्हणाले. "याबाबत मी देवेंद्र फडणवीसांशीही बोललो. पण त्यांनी लोकहिताचं काम आहे. त्यामुळे आपण यात काही भूमिका नको घ्यायला असं म्हटलं. पण देवेंद्रजींच्या जागी मी असतो तर आज चित्र वेगळंच असतं. देवेंद्रजी आमचे सहनशील नेते आहेत", अशी मिश्किल टिप्पणी राणे यांनी यावेळी केली.
विकासाच्या आड कोण येतं ते जनतेला माहीत आहे. सिंधुदुर्गातील जनता त्याची साक्षीदार आहे. उद्घाटनाची परवानगी मी आणली. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनासाठी ८ दिवसांत परवानगी देण्याची विनंती केली. त्यांनी ती तातडीनं मान्य केली आणि ९ ऑक्टोबर तारीख दिली. शिवसेना नेत्यांनी विमानतळासाठी काय केलं, त्यांची औकात काय, असेही प्रश्न राणेंनी विचारले.