'शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करण्याची सवय'; नारायण राणेंची शेलक्या शब्दात टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 03:02 PM2021-11-05T15:02:04+5:302021-11-05T15:05:33+5:30
'युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं.'
मुंबई: काही दिवसांपूर्वी कोकणातील चिपी विमानतळाच्या श्रेय वादावरुन आणि उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळआली होती. त्यानंतर आता परत एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, अनेक दिवसानंतर मी माध्यमांसमोर आलो आहे. मागील काही दिवसांपासून काही लोकांचे फटाके ऐकत होतो. पोटनिवडणुकीत एक अपक्ष आमदार जिंकला आणि शिवसेनेनं त्याचा डंका वाजवायला सुरुवात केली. मी त्या उमेदवाराची निशाणी पाहिली, त्यात बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज आहे. पण, शिवसेनेला उगाचच दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय लागलीये, असा टोला राणेंनी लगावला.
संजय राऊत सरकलाय
राणे पुढे म्हणाले की, संजय राऊतांचे अग्रलेख वाचत होतो, कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे, तुम्ही एकने धडक मारणार ? संजय राऊत सरकलेला माणुस आहे. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. आता तुमचे 56 आमदार आहेत, ते मोदींमुळेच निवडून आलेत. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असंही राणे यावेळी म्हणाले.
राणेंनी हेडिंगच वाचून दाखवल्या
नारायण राणेंनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत शरद पवार यांचे कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. यावेळी राणेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. आज मात्र ते पवार आणि काँग्रेसचे गुणगाण गात आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.