Narayan Rane : "उद्धव ठाकरेंचं अस्तित्व आहेच कुठे?... ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत"; नारायण राणेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 04:39 PM2022-09-18T16:39:36+5:302022-09-18T16:50:28+5:30
Narayan Rane Slams Shivsena Uddhav Thackeray : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला मिळायला हवी. शिवाय धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळणार, असंही राणे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Shivsena Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरेंचं अस्तित्व आहेच कुठे?... ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. तसेच "चांगल्या गोष्टींच कौतुक करावं. जे चित्ते उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिल. त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानलं पाहिजे. पण, काही लोकांना चांगलं बोलता येत नाही" असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
कोकणात नाणार रिफायनरी होणार. कोणाचाही विरोध चालू देणार नाही असंही म्हटलं आहे. "उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व आहेच कुठे? ज्या दिवसी ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्याच दिवशी त्यांचं अस्तित्व संपलं. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीपुरतं मर्यादित होतं. राज्यात देशात उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व कुठंही नाही. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहे" असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे.
"धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळणार"
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला मिळायला हवी. शिवाय धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळणार, असंही राणे म्हणाले. यासोबतच दसरा मेळावा कोणाचा होणार याचा निर्णय कोर्टात होईल. तो शिंदे गटाच्या बाजूने लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजपासून विदर्भ दौरा सुरू केला. विदर्भात कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याकडे कसं पाहता? असा प्रश्न विचारताच राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला शुभेच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
"कोकणात नाणार रिफायनरी होणार, कोणाचाही विरोध चालू देणार नाही"
"कोकणात नाणार रिफायनरी होणार. कोणाचाही विरोध चालू देणार नाही. नाणार कुठंही बाहेर जाऊ नये, यासाठी मी स्वतः मंत्र्यांना भेटलो. ते संबंधित कंपनीशी पुन्हा बोलत आहेत. हीच जागा आम्ही कंपनीला द्यायला तयार आहोत" असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. माध्यमांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं तसेच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.