नारायण राणे कुठेही गेले, तरी फरक पडत नाही
By admin | Published: May 6, 2017 03:51 AM2017-05-06T03:51:48+5:302017-05-06T03:51:48+5:30
राजकारणात जे समोर येतील त्यांच्याशी सामना करण्याची शिवसेनेची तयारी आहे. आमदार नारायण राणे हे कोणत्याही पक्षात गेले
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजकारणात जे समोर येतील त्यांच्याशी सामना करण्याची शिवसेनेची तयारी आहे. आमदार नारायण राणे हे कोणत्याही पक्षात गेले, तरी शिवसेनेला फरक पडत नाही, असा टोला शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगावला. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यापूर्वी विधानसभा, मुंबई महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढून शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे.
राणे हे भाजपमध्ये गेल्यास सेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. ते कोणत्याही पक्षात गेले, तरी सेनेला कोणताही फरक पडणार नाही. शिवसेनेने अनेक वादळं पचविली आहेत. राणे यांना कोणी कोणत्या पक्षात घ्यायचे हा त्या-त्या पक्षाचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-बंगलोर कॉरिडॉरबाबत मंत्री देसाई म्हणाले, या कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळलेले नाही. कोल्हापूर हे शेतीसमृद्ध असून याठिकाणी अधिकत्तर सुपीक जमिन आहे. कॉरिडॉरसाठी अशी चांगली जमीन देण्यास जागामालक तयार होणार का? हा मोठा प्रश्न आहे. स्थानिक आणि उद्योजकांची कॉरिडॉरची मागणी आहे. ती लक्षात घेऊन याबाबत सरकार प्रयत्नशील आहे.
‘एमआयडीसी’तील भूखंडाचे फेरवाटप
उद्योगांना विस्तारासाठी जागेची गरज असून ती पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्यातील एमआयडीसींमध्ये ज्या उद्योजकांनी भूखंड घेऊन त्यावर उद्योग सुरू केलेले नाहीत, ज्यांची मुदत संपली आहे. असे भूखंड ताब्यात घेऊन त्याचे फेरवाटप केले जाणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत दोन हजार भूखंड ताब्यात घेतले आहेत. ज्या उद्योगांना ५० एकरांवरील भूखंड दिले आहेत. मात्र, त्यांनी पाच वर्षांत त्याचा विकास केलेला नाही, असे भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.