नारायण राणे 'या' पक्षाकडून लढवणार लोकसभेची निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 17:27 IST2019-01-22T17:15:14+5:302019-01-22T17:27:51+5:30
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे.

नारायण राणे 'या' पक्षाकडून लढवणार लोकसभेची निवडणूक
मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे. आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून, आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडूनच लढवणार असल्याचे नारायण राणेंनी स्पष्ट केले आहे.
नारायण राणे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपावर नाराज आहेत. दरम्यान, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला होता. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मात्र राणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले होते. आज याबाबत प्रसारमाध्यमांकडून राणेंना विचारणा झाली असता त्यांनी आपण कुठल्याही पक्षात जाणार नसून, आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लढवणार आहोत, असे सांगितले.
यावेळी त्यांच्या भाजपासोबतच्या संबंधांबाबत विचारले असता ''मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही, तर राज्यसभेच्या खासदारकीसाठी भाजपाने आपल्याला पाठिंबा दिला होता.'' असे राणेंनी सांगितले. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नेमक्या किती जागा लढवेल, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी भाजप नेतृत्वावर नाराज असल्याने नारायण राणे यांनी तोंडसुख घेतले होते. यानंतर भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचाअजेंडा बनविण्याच्या समितीवर घेत चुचकारले होते. यावेळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. यामुळे राणे राष्ट्रवादीत जाणार अशाही अफवा उठल्या होत्या.