नारायण राणेंची मनोज जरांगेंवर टीका, म्हणाले, "तुझ्यात बघण्यासारखं काय, कपडे काढले तरी…’’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 05:04 PM2024-08-09T17:04:53+5:302024-08-09T17:06:36+5:30
Narayan Rane Criticize Manoj Jarange Patil: आतापर्यंत मागच्या ४०० वर्षांत बऱ्याच जणांनी दाढी वाढवली. ते छत्रपती झाले काय? नुसती दाढी वाढवून छत्रपती होता येत नाही, असा टोलाही नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला.
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं यासाठी आक्रमक आंदोलन करत असलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सातत्याने भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून भाजपामधील नेत्यांनीही मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा खासदार नारायण राणे यांनीही मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केलं होतं. तर मनोज जरांगे पाटील यांनीही नारायण राणे यांना चार शब्द सुनावले होते. त्यानंतर आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या टीकेमधून मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमात नारायण राणे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले की, मनोज जरांगे पाटील सोलापूरमध्ये मला उत्तर देताना म्हणाले, राणेसाहेब मराठवाड्यात येताहेत तर येऊ दे. आमच्याकडे काय बघणार? आम्ही कपडे घालतो. अरे कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो. तुझ्यात बघण्यासारखं आहे काय? असा बोचरा सवाल नारायण राणे यांनी विचारला.
आतापर्यंत मागच्या ४०० वर्षांत बऱ्याच जणांनी दाढी वाढवली. ते छत्रपती झाले काय? नुसती दाढी वाढवून छत्रपती होता येत नाही, असा टोलाही नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. नारायण राणे यांच्या या टीकेमुळे जरांगे पाटील आणि राणे यांच्यातील वाद पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यावेळी नारायण राणे यांनी त्यांचे कट्टर विरोधक उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, बाळासाहेब गेले आणि शिवसेना संपली. आता हे काय करतात, शिव्या देतात. देवेंद्र फडणवीस यांना शिविगाळ केली. पण त्यांनी पलटवार केला का, शिव्या दिल्या का, तर नाही. त्यांच्याकडे सज्जनपणा आहे, सालस आहेत, बुद्धिमत्ता आहे. जनहित, लोकहित, सरकार कसं चालवावं, हे देवेंद्र फडणवीस यांना कळतं. मग आपण शिविगाळ करणाऱ्याच्या नादी का लागावं. उद्धव ठाकरे यांची सध्या चांगली मानसिक स्थिती नाही. मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो. त्यामुळे त्यांना काय येतं हे मला माहिती आहे, असे नारायण राणे म्हणाले.