नारायण राणे स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:56 PM2019-08-29T20:56:11+5:302019-08-29T20:56:50+5:30
स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : स्वाभिमान पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येत असताना भाजपने नारायण राणे यांना जवळ करून शह-काटशहाचे राजकारण केले आहेत.
मुळात राणे हे खासदार झाले तेव्हा त्यांना एबी फॉर्म भाजप पक्षाने दिला होता. त्यामुळे राणे जरी स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा असले तरी ते अधिकृतरीत्या भाजपाचे खासदार आहेत. आपण स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे उभा केला असल्याचे ते सांगत असतात. शिवाय त्यांची दोन्ही मुले नितेश आणि निलेश हेदेखील आपण स्वाभिमान पक्षाचे आहोत असे सांगतात. मात्र बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर काँग्रेसची झालेली वाताहत आणि राष्ट्रवादीतून सुरू झालेले आउटगोइंग या पार्श्वभूमीवर राणे द्विधा मनस्थितीत होते. आज त्यांनी भाजपमध्ये आपला पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही आज भेट घेतली. त्या भेटीत काय चर्चा झाली हा तपशील कळू शकला नाही. मात्र काही गोष्टी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडून कबूल करून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
येत्या काही दिवसात राणे भाजपच्या प्रचारात सक्रिय झालेले पहावयास मिळतील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पट्टयात राणे यांनी भाजपच्या जागा विजयी कराव्यात आणि ते करत असताना राणे समर्थकांना उमेदवारी द्यावी याविषयी त्यांनी भाजपने त्यांचे मन वळवण्याची माहिती आहे. राणे यांनी नितेश साठी तिकीट मागितले. त्याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील किमान तीन जागा आपल्याला मिळाव्यात असा त्यांचा आग्रह आहे. त्याशिवाय अन्य काही जागांविषयी देखील त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.
छगन भुजबळ शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू असताना शिवसेनेने जर भुजबळ यांना प्रवेश दिला तर आम्ही राणे यांना जाहीरपणे पक्षात देऊ अशी भूमिका भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने घेतली असून, त्या पार्श्वभूमीवर राणे यांची आजची भेट विशेष मानली जात आहे.
सायंकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्याशी बंद दाराआड सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करताना कोणालाही आत येऊ दिले नाही असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.