ठरले...! नारायण राणेंचा 'स्वाभिमान' लोकसभेच्या पाच जागा लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:38 PM2019-01-22T12:38:43+5:302019-01-22T13:23:20+5:30
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार या वावड्याच ठरल्या असून त्यांचा स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या पाच जागा लढविणार हे स्पष्ट झाले आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार या वावड्याच ठरल्या असून त्यांचा स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या पाच जागा लढविणार हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत राणे यांनी सोमवारी रात्री यासंबंधी चर्चा केल्याचे विश्वसनिय सुत्रांनी सांगितले.
भाजप नेतृत्वावर नाराज असल्याने नारायण राणे यांनी तोंडसुख घेतले होते. यानंतर भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा अजेंडा बनविण्याच्या समितीवर घेत चुचकारले होते. यावेळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. यामुळे राणे राष्ट्रवादीत जाणार अशाही अफवा उठल्या होत्या. यानंतर राणे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते. पण नितेश राणे यांनी ट्विट करत राणे काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
हे बरे आहे..
— nitesh rane (@NiteshNRane) January 21, 2019
राणे साहेब कांग्रेस मधे होते तेव्हा कांग्रेस नेत्यांनीच दिल्ली पासुन गल्ली पर्यन्त बोंब केली की बीजेपीत जात आहेत..
राणे साहेब कांग्रेस सोडून बाहेर आले आता कांग्रेस नेतेच बोंब करतात की कांग्रेस मधे परत येत आहेत!!
आमची दिशा ठरली आहे..
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष!!
सोमवारी रात्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जागावाटपावरून चर्चा झाली. यावेळी राणे यांचा स्वाभिमान पक्ष राज्यातील लोकसभेच्या पाच जागा लढविणार असल्याचे ठरविण्यात आले. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा-कोल्हापूरमधील प्रत्येकी एक, सोलापूर एक आणि औरंगाबादमधील एक अशा पाच जागांवर बोलणी झाल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.