नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत कोअर कमिटीत चर्चा झालीच नाही - चंद्रकांतदादा पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 09:09 PM2017-09-22T21:09:41+5:302017-09-22T21:10:11+5:30
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत अद्यापपर्यंत कोणतीही चर्चा कोअर कमिटीमध्ये झालेली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे, दि. २२ - कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत अद्यापपर्यंत कोणतीही चर्चा कोअर कमिटीमध्ये झालेली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पक्षामध्ये कोणाला घ्यावे अथवा घेऊ नये याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याचे सांगत त्यांनी राणेंच्या पक्षप्रवेशाबाबतचे गुढही कायम ठेवले.
राणे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन पक्ष सोडत सल्याची घोषणा केली होती. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सोनिया गांधीचे राजकीय सल्लगार अहमद पटेल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या नेत्यांवर टीका करताना त्यांनी भाजपाच्या नेत्यांचा नामोल्लेख आणि टिका करणे टाळले होते. राणे भाजपवासी होणार अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे.
पाटील हे गणेशोत्सवापुर्वी कोकण दौ-यावर असताना राणे भाजपात आल्यास आपले खाते त्यांना द्यायला तयार असल्याचे वक्तव्य पाटील यांनी केले होते. याबाबत पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता, ‘मी कोकणात गणेशोत्सवापुर्वीचे रस्ते पाहण्यासाठी गेलो होतो. पत्रकारांनी तेथे राणेंनी सार्वजनिक बांधकाम खाते मागितल्यास तुम्ही काय कराल, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना पक्ष आणि संघटनेसाठी आपण काहीही करायला तयार असल्याचे मी सांगितले होते. त्यावरुन मी राणेंसाठी खाते सोडणार असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या. प्रत्यक्षात माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ होता.’ असे पाटील यांनी सांगितले.
राणेंना भाजपा प्रवेशाची आॅफर देणार का? या प्रश्नावर त्यांनी ‘आॅफर’ देण्यचे अधिकार माझ्याकडे नसून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर चर्चा होईल असे ते म्हणाले. राणेंच्या अहमदाबाद येथील अमित शहांसोबतच्या भेटीबाबत विचारले असता, आपल्याला माध्यमांमधून ही माहिती कळल्याचे सांगत यावर बोलणे टाळले. राणेंच्या प्रवेशाबाबत प्राथमिक स्तरावर तरी चर्चा झाली आहे का, या प्रश्नाला बगल त्यांनी पक्षाच्या अकरा जणांच्या कोअर कमिटीमध्ये अद्यापतरी याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांना व्हावा याकरिता २२ सप्टेंबर अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आॅनलाईन डेटा संकलीत करण्याचे काम सुरु असून दर मंगळवारी कॅबिनेट संपल्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफी अंमलाबजावणीची समितीची आढावा बैठक घेतली जाते. १५ आॅक्टोबरपर्यंत उस्मानाबाद जिल्हा प्राध्यान्याने कर्ज मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जमाफी ची रक्कम आॅक्टोबर अखेर बँकांना दिली जाणार आहे. परिवहन मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी ही जवाबदारी स्वीकारली आहे. राज्यात अधिकाधिक जलद गतीने कर्जमाफी करण्यात येईल.
- चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री