नारायणदास जाजू यांचे निधन
By admin | Published: December 12, 2015 02:40 AM2015-12-12T02:40:11+5:302015-12-12T02:40:11+5:30
स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ गांधीवादी नारायणदास श्रीकृष्णदास जाजू यांचे शुक्रवारी पहाटे येथील जाजूवाडीतील निवासस्थानी निधन झाले
वर्धा : स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ गांधीवादी नारायणदास श्रीकृष्णदास जाजू यांचे शुक्रवारी पहाटे येथील जाजूवाडीतील निवासस्थानी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सकाळी १० वाजता स्थानिक मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धार्मिक परंपरेला फाटा देत त्यांच्या स्नुषांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा देऊन अग्नीदेखील दिला.
सहा महिन्यांपासून ते आजारी होते. १४ दिवसांपूर्वीच त्यांनी संलेखनाव्रत सुरू केले होते. अन्न, औषध, पाणी वर्ज्य करीत आयुष्याची निवृत्ती स्वीकारली होती. धार्मिक रुढींना फाटा देत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी यमुनाताई, डॉ. उल्हास, डॉ. सुहास ही मुले, स्नुषा व नातवंडे असा आप्त परिवार आहे.
जाजू यांचा जन्म २४ एप्रिल १९२२ रोजी वर्धा येथे झाला. १९४० मध्ये वर्ध्यातील पहिल्या जी. एस. कॉमर्स कॉलेजचे ते पहिले विद्यार्थी होते. १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. यामध्ये त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. गेल्या वर्षी शिक्षा मंडळाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात त्यांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. रविवारी दुपारी ४ वाजता जाजूवाडी येथे प्रार्थना सभा होणार आहे. (प्रतिनिधी)