नारायणपूरात महाप्रसादामुळे विषबाधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2016 02:14 AM2016-09-15T02:14:07+5:302016-09-15T02:14:07+5:30

दोन जण अत्यवस्थ; ८0 रुग्णांवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार.

Narayanpur Mahaprashadan cause of poisoning! | नारायणपूरात महाप्रसादामुळे विषबाधा!

नारायणपूरात महाप्रसादामुळे विषबाधा!

Next

खामगाव/नांदुरा(जि. बुलडाणा), दि. १५- गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील निमगावनजीक असलेल्या नारायणपूर येथे आयोजित भंडार्‍यात महाप्रसाद घेतल्यानंतर सुमारे ८0 जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी घडली. या रुग्णांवर नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गणेशोत्सवादरम्यान नारायणपूर येथे १४ सप्टेंबर रोजी गावकर्‍यांनी महाप्रसादाचे आयोजन दुपारी केले होते. या महाप्रसादामध्ये पोळी, काशिफळाची भाजी, वरण, भात असे पदार्थ ठेवण्यात आले होते. नारायणपूर तसेच नजीकच्या निमगाव येथील सुमारे ४00-५00 लोकांनी दुपारच्या सुमारास हा महाप्रसाद घेतला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेदरम्यान महाप्रसाद घेतलेल्या काही ग्रामस्थांना उलटी, मळमळ, चक्कर येणे यासारखे त्रास जाणवू लागल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे उपचारासाठी धाव घेतली. मळमळ व उलट्या होणार्‍यांची संख्या वाढत गेली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर समाजसेवी संस्था, त्यांच्या रुग्णवाहिका, कार्यकर्ते यांनी तत्काळ दवाखान्यात धाव घेऊन मदत केली. घटनेचे वृत्त कळताच आ.चैनसुख संचेती यांनीही तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांना धीर दिला. ८0 रुग्णांना रात्री १0 वाजेपर्यंत खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या रुग्णांना खामगाव येथील सामान्य रुग्णांलयात उपचारासाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर, आ.अँड.आकाश फुंडकर यांनी तातडीने सामान्य रुग्णालयात धाव घेतली व रुग्णांची विचारपूस केली तसेच उपचाराबाबत डॉक्टरांकडून आढावा घेतला. रुग्णांची वाढती संख्या पाहता सामान्य रुग्णालयातील नियुक्त सकाळ पाळीतील डॉक्टरांनासुद्धा बोलविण्यात आले.
यावेळी या रुग्णांवर सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश सिरसाट, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश टापरे, डॉ.नाईक, डॉ.गोरे, डॉ.सोनटक्के, डॉ.हर्षल नारखेडे आदींनी तातडीने उपचार केले.
दरम्यान, माजी आ.दिलीपकुमार सानंदा, कृउबास सभापती संतोष टाले, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांनीही सामान्य रुग्णालयात भेट देत रुग्णांची विचारपूस केली. या रुग्णांना सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रसंगी सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीसुद्धा रुग्णसेवेत मोठा हातभार लावला.

Web Title: Narayanpur Mahaprashadan cause of poisoning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.