'आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, एकदाच काय ते सत्य बाहेर येऊ द्या’ नितेश राणेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:08 AM2022-12-22T11:08:27+5:302022-12-22T11:09:16+5:30
Nitesh Rane : राहुल शेवाळेंच्या आरोपांनंतर नितेश राणेही आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक झाले आहेत. तसेच या प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
मुंबई - शिंदे गटातील आमदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेमध्ये दिशा सालियान मृत्यूप्रकरणी सनसनाटी आरोप केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान, शेवाळेंच्या आरोपांनंतर नितेश राणेही आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक झाले आहेत. तसेच या प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, सगळ्यांनी विचार करायला हवा महाराष्ट्रात एवढे राजकारणी आहे. जेव्हा सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियनचा विषय येतो तेव्हा आदित्य ठाकरेंचाच उल्लेख का होतो. इतरांचा का होत नाही. म्हणजेच कुठे ना कुठे दाल मे कुछ काला है, असा संशय नितेश राणे यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, आतापर्यंत मी, राणेसाहेब, अमित साटम, अतुल भातखळकर आम्ही सगळेजण बोलत होतो. सुशांतसिंह राजपूतचे फॅन्सही याच्या चौकशीची मागणी करत आहेत. आता काल ज्यांनी हा विषय लोकसभेत उपस्थित केला ते राहुल शेवाळे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. यांच्या विश्वासातील होते. वर्षानुवर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. काल आदित्य ठाकरे म्हणाले की मी त्यांना काडीची किंमत देत नाही पण हेच शेवाळे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना खासदार असताना ते तुमच्या घराकडे पेट्या पोहोचवायचे तेव्हा त्यांना किती किंमत होती, तेही तुम्ही सांगा. त्यांच्याच किचन कॅबिनेटमधील खासदार सांगतो की, जे ४४ कॉल झाले. त्यातील एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे आहे. तर त्याची चौकशी झाली पाहिजे. आतापर्यंत आम्ही बोलत होतो, त्याच्यापेक्षा स्पष्ट भूमिका राहुल शेवाळे यांनी घेतली आहे. त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की, एकदाच आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे एकदाच काय ते. जशी आता श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताबची नार्को टेस्ट केल्यावर जसं सत्य समोर आलं, तशीत आदित्य ठाकरेंची एकदा नार्को टेस्ट करा. ए फॉर आफताब, ए फॉर आदित्य. सगळ्या विकृतीचं नाव एकसमान झाल्यासारखं दिसतंय. म्हणून एकदाच यांची नार्को टेस्ट करा आणि सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणातील सत्य समोर येऊ द्या, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
दिशा सालियन प्रकरणाची केस आजही मुंबई पोलिसांकडे आहे, सीबीआयकडे नाही आहे सीबीआय केवळ सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करत आहेत. मुंबई पोलीसच या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतो की, दिशा सालियन प्रकरणाची केश पुन्हा एकदा रिओपन करा. ८ आणि ९ जूनच्या रात्री काय झाली. सुशांतसिंह राजपूतची हत्या का करण्यात आली. रिया चक्रवर्तीची काय भूमिका आहे. दिशा सालियनच्या केसमध्ये आयओ दोनदा का बदलण्यात आला. तिच्या घराकडील आणि सुशांत राहायचा तिथले त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज का गायब आहेत. व्हिजिटर बुकची पाने का फाडण्यात आली, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणे यांनी केली.