देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, जनतेच्या पदरी दारिद्र्य - चव्हाण
By admin | Published: December 30, 2016 01:22 AM2016-12-30T01:22:26+5:302016-12-30T01:22:26+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मात्र या दोघांचा कारभार पाहता देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनतेच्या पदरी मात्र दारिद्र्य अशी
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मात्र या दोघांचा कारभार पाहता देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनतेच्या पदरी मात्र दारिद्र्य अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दांत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपाचा समाचार घेतला.
काँग्रेस प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीवर सडकून टीका केली. चव्हाण म्हणाले की, नोटाबंदी करताना काळा पैसा, दहशतवाद, नक्षलवाद रोखला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले होते.
प्रत्यक्षात मात्र यातील काहीच साधले नाही; शिवाय पंतप्रधानांनी मागितलेली ५० दिवसांची मुदत उलटून गेली आहे. त्यामुळे बँक आणि एटीएममधून स्वत:चेच पैसे काढण्यावर सरकारने जे निर्बंध घातले आहेत ते ताबडतोब मागे घ्यावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली. नोटाबंदीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल झाले आहेत. कॅशलेसची जी टूम निघाली आहे त्यामुळे व्हिसा, मास्टरकार्ड अशा परदेशी कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी मोदी कॅशलेस व्यवहाराचा अट्टाहास का करीत आहेत, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. एकीकडे नोटाबंदीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असताना भाजपा नेत्यांकडे मात्र कोट्यवधींची रक्कम सापडत आहे. सरकारच्या या अन्यायपूर्ण निर्णयाविरोधात काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहे.
२ जानेवारीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पत्रकार परिषद घेतील. ८ जानेवारी रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मुंबई काँग्रेसचे टॅटू आंदोलन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित भ्रष्टाचारावरुन मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातावर ‘हमारा पंतप्रधान रिश्वतखोर है’ असे गोंदवून घेत टॅटू आंदोलन केले.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सहारा समूहाकडून पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी मुंबईत काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत टॅटू आंदोलन केले. पन्नास काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातावर ‘हमारा पंतप्रधान रिश्वतखोर है’ असे गोंदवून घेतले. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी सहारा समुहाकडून पैसे घेतल्याचे उघड झाले होते,
आयकर विभागाच्या धाडीत ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे याबाबत मोदी यांनी खुलासा करायाला हवा, असे निरुपम म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. अशाप्रकारच्या आंदोलनातून काँग्रेसचे मानसिक दुर्गुण दिसून आले असून हा पक्ष किती खालच्या पातळीवर गेला आहे हे स्पष्ट होते, अशी प्रतिक्रीया भाजपा आमदार राम कदम यांनी दिली.
काँग्रेस काळात कोणते आणि किती घोटाळे झाले हे देशाने पाहिले आहे. पराभवाच्या भीतीमुळे काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाल्याचेही कदम म्हणाले.
राज्यभर निषेध करणार
- सुरुवातीला नोटाबंदीचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता नोटाबंदीविरोधात सूर आळवायला सुरुवात केली आहे. नोटाबंदीची अंमलबजावणी पूर्णपणे फसली आहे. काळा पैसा, दहशतवादाचे प्रश्न जैसे थे आहेत. उलट सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिक यांची प्रचंड होरपळ होत आहे.
या निर्णयामुळे देशभर आर्थिक मंदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेच्या आक्रोशाला आवाज देण्यासाठी ९ जानेवारी रोजी राज्यभर तीव्र निषेध आंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.