नरेंद्र जाधव आणि येणारे आत्मभान
By admin | Published: August 16, 2015 01:48 AM2015-08-16T01:48:28+5:302015-08-16T01:48:28+5:30
डॉ. नरेंद्र जाधव संघाच्या व्यासपीठावर गेल्यामुळे आणि त्यांनी डॉ. आंबेडकर आणि हेडगेवारांची तुलना केल्यामुळे बऱ्याच जणांना त्यांचा राग आला आहे. राग येणाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल
- प्रा. दीपक पवार
डॉ. नरेंद्र जाधव संघाच्या व्यासपीठावर गेल्यामुळे आणि त्यांनी डॉ. आंबेडकर आणि हेडगेवारांची तुलना केल्यामुळे बऱ्याच जणांना त्यांचा राग आला आहे. राग येणाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल भ्रमनिरास झालेले किती आणि हा माणूस असाच निघणार याची आम्हाला खात्री होती असं छातीठोकपणे सांगणारे किती, ते सांगता येणं कठीण आहे. संघविचाराच्या पक्षाला निर्विवाद सत्ता मिळाल्यामुळे जाधव राजकीय पुनर्वसनासाठी तिकडे सरकलेत, असा प्रमुख आक्षेप आहे. डॉ. जाधव हे काही जनाधार असलेले नेते नव्हेत. त्यामुळे ते उद्या खरंच भाजपामध्ये सामील झाले किंवा सहयोगी सदस्य झाले तर संघपरिवाराचा थेट खूप फायदा होईल असं नाही. पण दलित समाजातला एक लोकप्रिय माणूस फोडल्याचं श्रेय त्यांना नक्की मिळेल. डॉ. जाधवांना काय मिळेल? राज्यसभेचं सभासदत्व, रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नरपद किंवा अगदीच लॉटरी लागली तर केंद्रात मंत्रिपद किंवा परदेशातल्या एखाद्या दूतावासात नेमणूक, नीति आयोगावर नेमणूक, यापलीकडे माझा लहानसा मेंदू चालत नाही.
जाधव हे उत्तम वक्ते आहेत. त्यांना लोकांशी, विशेषत: प्रसारमाध्यमांशी चांगले संबंध कसे ठेवावेत हे माहीत आहे. त्यांचं बोलणं ज्वलज्जहाल नाही. बातम्या म्हणजे मनोरंजन, अशा व्याख्येच्या काळात जाधव हे वक्ते म्हणून फिट्ट बसतात. पुन्हा ते सहसा कुणाला नाही म्हणत नसावेत. त्यामुळे गेला काही काळ वगळला तर सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांची उपस्थिती भरपूर असते. एकच पुस्तक आणि तेही बहुतांश वडिलांनी लिहिलेलं असताना जाधवांना मिळालेलं यश लक्षणीयच म्हटलं पाहिजे. ते पॅकेजिंग, नेटवर्किंग आणि ग्रंथालीने केलेलं मार्केटिंग याचं यश आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात जाधव लेखक म्हणून पुढे गेलेत का? तसं दिसत नाही. दलित आत्मचरित्रांमधला त्रागा, अभावग्रस्तता आणि विद्रोह हे सगळं या पुस्तकात फार पाहावं न लागल्याने मध्यमवर्गीयांना सुद्धा या पुस्तकाशी जोडून घेता आलं. खरं पाहता जाधवांनी त्यानंतर ताकदीचं गद्य लिहायचा प्रयत्न करायला हवा होता. लेखनातला सर्व आक्रस्ताळेपणा मान्य करूनही लक्ष्मण मानेंनी ते केलं. पण जाधव स्वत:च्या प्रेमात पडले. त्यामुळे त्यांची वाढ खुंटली.
जाधव राजकारणात जातील अशी चर्चा गेली बरीच वर्षे होती. त्यांना राज्यसभेचं खासदारपद मिळेल अशा बातम्या होत्या. पण जाधव म्हणजे प्रकाश आंबेडकर किंवा रामदास आठवले नव्हेत. सुखासीन आयुष्य सोडून राजकारणाच्या धकाधकीत उतरायला त्यांचं मन त्यांना परवानगी देत नसावं. मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या हस्ते ‘आमचा बाप’च्या कुठल्या तरी भाषेतल्या कितव्या तरी आवृत्तीचे प्रकाशन झाले होते. पण काँग्रेसच्या गुहेत जाधवांना वाट सापडली नसावी. त्या काळात जाधवांनी रवींद्रनाथांच्या कवितेवरचं एक पुस्तक केलं होतं. कोणी, कशावर, काय आणि कधी लिहावं यावर लोकशाहीत तसं बंधन नसलं तरी एकदम रवींद्रनाथांबद्दल लिहिणं गमतीचंच होतं. मात्र जाधव तेव्हा राजकारणात गेले नाहीत. दरम्यान, ते सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार परिषदेत होते आणि तिथे सोनिया गांधी त्यांचा सल्ला कसा घेतात हे कुठकुठून कळायचं. मग एका वर्तमानपत्रात डॉ. मुणगेकर आणि डॉ. जाधव यांच्याबद्दल टीकात्मक मजकूर प्रसिद्ध झाला. डॉ. मुणगेकर यांनी त्याबद्दल मौन बाळगलं, पण जाधवांनी त्यावर प्रतिक्रिया देऊन बुडत्याचा पाय आणखी खोलात घालवला.
२०१४च्या निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं. पुढची किमान पाच वर्षे हे सरकार हलणार नाही, असं दिसू लागलं (आता ते सरकार हलत नाहीचये, पण ते वेगळ्या अर्थाने). त्यामुळे लोक दिशा बदलू लागले. जाधवांचंही असंच झालं असण्याची शक्यता आहे. संघात बाळासाहेब देवरसांच्या काळापासून समरसतेची एक पायवाट आहे. भिकूजी इदाते वगैरे लोकांनी त्याची पायाभरणी केली आहे. पण संघाच्या या भूमिकेकडे दलित चळवळीतले आणि एकूणच समतावादी आत्यंतिक संशयाने पाहतात. त्यामुळे संघाच्या व्यासपीठावर गेलो तर जातीबहिष्कृत होऊ, या भीतीने अनेक जण तिकडे जायचं टाळतात. लहानसहान लेखक व कवी सगळीकडे जाऊन-येऊन असले तरी नरेंद्र जाधवांसारखा माणूस गळाला लागणं किंवा लागला आहे असं चित्र निर्माण करता येणं, ही काही सोपी गोष्ट नाही. मी संघ आणि दलित यांच्यातला पूल होऊ इच्छितो, हे जाधवांचं म्हणणं भाजपा सत्तेवर यायच्या आधीचं असतं तर समजण्यासारखं होतं. पण आता निर्विवाद बहुमताच्या आधारे भाजपा आणि संघपरिवार मुस्कटदाबी करतोय असं स्पष्ट दिसत असताना त्यांनी असं म्हणणं हे संधिसाधूपणाचं वाटणं स्वाभाविक आहे.
देशाच्या पंतप्रधानाने एखाद्या कार्यक्रमास येणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकाने एखाद्या कार्यक्रमास येणं यात फरक आहे. संघ बाबासाहेबांना प्रात:स्मरणीय मानत असला तरी त्यावर लोकांचा फार विश्वास नाही. या लोकांच्या मनातल्या शंका मांडणं आणि त्याची उत्तरं सरसंघचालकांकडून मागणं हे धाडस जाधवांनी दाखवायला हवं होतं. ते त्यांनी दाखवलं नाही. पण म्हणून त्यांच्यावर बहिष्कार घाला, असे हाकारे देण्यात अर्थ नाही. दलित, बहुजनांना आपल्यापासून दूर ठेवणं संघाला परवडणारं नाही आणि त्यासाठी त्यांना आपली भूमिका बदलावीच लागेल. जाधवांनी त्यांच्या व्यासपीठाचा आधार घेतल्याने ते होणार नाही. पण या निमित्ताने जी चर्चा घडेल ती दलित, बहुजनांच्या आत्मभानाच्या दृष्टीने महत्त्वाची असेल.