लाचखोरीच्या आरोपातून नरेंद्र मेहता दोषमुक्त

By Admin | Published: November 9, 2016 03:42 AM2016-11-09T03:42:18+5:302016-11-09T03:42:18+5:30

लाचखोरीच्या आरोपातून मीरा भार्इंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांना ठाण्याच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त केले.

Narendra Mehta was acquitted of the charges of bribery | लाचखोरीच्या आरोपातून नरेंद्र मेहता दोषमुक्त

लाचखोरीच्या आरोपातून नरेंद्र मेहता दोषमुक्त

googlenewsNext

ठाणे : लाचखोरीच्या आरोपातून मीरा भार्इंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांना ठाण्याच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त केले. १४ वर्षे चाललेल्या या खटल्यातील सर्व साक्षीदार फितूर झाल्याने, बचाव पक्षाची बाजू बळकट झाली होती. मेहता यांचा हा एक प्रकारे राजकीय पुनर्जन्मच मानला जात आहे.
ंमीरा भार्इंदर महानगरपालिकेच्या २00२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत नरेंद्र मेहता अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. डिसेंबर २00२ मध्ये कंत्राटदार हनुमंत मालुसरे यांनी हेमंत पटेल यांच्या गाळ्याची उंची वाढवण्याचे कंत्राट घेतले होते. याबाबतची माहिती मेहता यांना मिळाल्यानंतर, त्यांनी मालुसरे यांच्याकडे ५0 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी २0 हजार रुपयांचा पहिला हप्ता २७ डिसेंबर २00२ रोजी देण्याचे ठरले होते. दरम्यान, मालुसरे यांनी याबाबतची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) नोंदविली. मालुसरे आणि काशीनाथ दाणेकर हे २0 हजार रुपये घेऊन मेहता यांच्या कार्यालयात गेले त्यावेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना रंगेहात पकडले. संपूर्ण प्रकरणाचा तपास करून, एसीबीने दोषारोपपत्र सादर केले. मेहता यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याने सिद्ध होऊ न शकल्याने, विशेष न्यायाधिश व्ही. व्ही. बांबर्डे यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
मेहता यांच्याविरूद्धचे हे प्रकरण ते नगरसेवक असतानाच्या काळातील आहे. दरम्यानच्या काळात ते मीरा भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले. न्यायालयाच्या निकालावर त्यांच्या आमदारकीचे भवितव्य अवलंबून असल्याने राजकीय वर्तुळाचे या प्रकरणाकडे लक्ष लागून होते.

‘ती’ रक्कम दुचाकीची, बचाव पक्षाचा युक्तिवाद
घटनेच्या १0 दिवसांपूर्वी तक्रारदार मालुसरे यांनी त्यांच्या मुलासाठी नरेंद्र मेहता यांच्या प्रणव मोटार्समध्ये मोटारसायकल खरेदीसाठी आगाऊ रक्कम जमा केली होती. घटनेच्या दिवशी मालुसरे यांनी दिलेले २0 हजार म्हणजे त्या व्यवहारातील उर्वरित रक्कम होती, असा युक्तिवाद नरेंद्र मेहता यांच्या वतीने अ‍ॅड. हर्षद एच. पोंडा, अ‍ॅड. सी.व्ही. बाबरदेसाई, अ‍ॅड. राजन साळुंके आणि अ‍ॅड. एस.डी. गायकवाड यांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून, मेहता यांची निर्दोष मुक्तता केली.


मेहता यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे सरकार पक्षास न्यायालयात सिद्ध करता आले नाही. तक्रारदार वगळला तर, अन्य कुणीही मेहतांविरूद्धच्या आरोपांवर न्यायालयासमोर बोलू शकले नाही. या प्रकरणातील पंच, सर्व साक्षीदार फितूर झाले. एवढेच काय, मेहता यांना पैसे देण्यासाठी तक्रारदारासोबत गेलेले त्यांचे मित्र दाणेकर यांची साक्षही न्यायालयासमोर टिकू शकली नाही.

न्यायालयाच्या निर्णयास आव्हान, फितूर पंचावरही कारवाई : सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी मांडली. न्यायालयाच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. न्यायालयात फितूर झालेले या प्रकरणातील पंच रमेश गराडे हे शासकीय कर्मचारी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा अर्ज अ‍ॅड. फड यांनी न्यायालयासमोर सादर केला व न्यायालयाने तो मंजूर केला.

Web Title: Narendra Mehta was acquitted of the charges of bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.