नाशिकच्या शेतकऱ्यांची कमाल; 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींनी केलं कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 12:47 PM2020-05-31T12:47:03+5:302020-05-31T13:07:58+5:30
नाशिकच्या सटाणा येथील राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने सॅनिटायझेशन मशीनची निर्मिती केली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशवासियांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे. तसेच, जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी नाशिकमधील राजेंद्र जाधव या शेतकऱ्याचे कौतुक केले आहे.
नाशिकच्या सटाणा येथील राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने सॅनिटायझेशन मशीनची निर्मिती केली आहे. आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी स्वत:च्या खर्चातून सॅनिटायझेशन मशीन तयार आहे. याबाबत, नरेंद्र मोदी यांनी राजेंद्र जाधव यांचे 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे कौतुक केले.
दरम्यान, नाशिकच्या बागलाण तालुक्यातील शेतकरी आणि व्यावसायिक असलेले राजेंद्र जाधव संशोधक आहेत. त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अवघ्या 25 दिवसांमध्ये ट्रॅक्टरवर बसवता येवू शकेल, असा नाविन्यपूर्ण फवारणी यंत्र विकसित केले आहे. या फवाऱ्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर रस्ते, सोसायट्या, दारे, कुंपणाच्या भिंती अगदी स्वच्छ धुवून काढणे शक्य होत आहे.
या फवाऱ्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेला अॅल्युमिनियमची दोन पाती बसवण्यात आली आहेत. दोन्ही पाती विरुद्ध दिशेने हवा शोषून घेतात व नोझल (छिद्र) मधून उच्च दाबाने निर्जंतुकीकरणाच्या द्रावाच्या तुषारांचे सिंचन सर्व दिशांना करतात. ही पाती 180 अंशाच्या कोनामध्ये फिरतात. तसेच जमिनीपासून 15 फूट उंचीपर्यंतच्या भिंतीचीही स्वच्छता करण्यास ती सक्षम आहेत. या फवाऱ्याद्वारे स्वच्छता, निर्जंतुकीकरणासाठी 15 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर केला जाऊ शकतो.
या स्वच्छता यंत्रामध्ये एकावेळेस 600 लीटर जंतुनाशक मिश्रीत द्रावण टँकरमध्ये ठेवण्याची सुविधा आहे. त्यामुळे या फवाऱ्याने कुंपणाच्या भिंती, दारे यांची स्वच्छता करणे सोईचे आहे. या यंत्राची उपयुक्तता तपासून कोरोना संकट काळात त्यांनी हे यंत्र सटाणा नगरपरिषदेला वापरासाठी दिले. आरोग्य खात्याच्या मानकाप्रमाणे या यंत्रामुळे कोरोना निर्जंतुकीकरणाच्या लढाईला मोठे यश मिळत आहे.
आणखी बातम्या...
राज्यातील सरकारी कार्यालयं टप्प्या-टप्प्यानं सुरू होणार, कर्मचाऱ्यांसाठी नियमावली जाहीर
CoronaVirus News : कोरोनाला हरवण्यासाठी ICMR नवा प्लॅन; सर्व राज्यांना दिला 'हा' सल्ला