'डी कंपनी'कडून PM मोदींच्या हत्येचा कट; मुंबई पोलिसांना मिळाला धमकीचा ऑडिओ मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:27 PM2022-11-22T13:27:48+5:302022-11-22T13:31:48+5:30
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर धमकीचा ऑडिओ मेसेज पाठवला आहे.
मुंबई: इकडे गुजरात निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये प्रचार करत आहेत, तर तिकडे मुंबईत त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एक ऑडिओ मेसेज आला आहे. या ऑडिओ मेसेजमध्ये दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीच्या दोन गुडांना पीएम मोदींना मारण्याचे काम सोपवण्यात आल्याचे म्हटले आहे.
दोन गुडांची नावेही सांगितली
पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांची क्राइम ब्रँच सतर्क झाली आहे. हा धमकीचा मेसेज अज्ञात व्यक्तीने पाठवला आहे. धमकीचा ऑडिओ मेसेज पाठवणाऱ्याने दाऊद इब्राहिमच्या दोन साथीदारांची नावेही सांगितली आहेत. मुस्तफा अहमद आणि नवाज अशी त्यांची नावे आहेत. मात्र ऑडिओ मेसेज पाठवणाऱ्याने त्याचे नाव उघड केलेले नाही. ही ऑडिओ क्लिप हिंदीत आहे.
याप्रकरणी एका व्यापाऱ्याची चौकशी
पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी देणार्या ऑडिओ क्लिपसाठी आतापर्यंत एकूण 7 मेसेज पाठवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे. एका हिरे व्यापाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये एक फोटोही पाठवण्यात आला आहे. हा फोटो सुप्रभात वेळ नावाच्या व्यक्तीचा आहे. ही व्यक्ती संबंधित हिरे व्यापाऱ्याकडे काम करायची. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.
अनेकदा धमक्या आल्या आहेत
मुंबई पोलिसांना सातत्याने अशा धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक धमकीचा फोन आला होता. पाकिस्तानातून आलेल्या या कॉलमध्ये 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय, अशाच आणखी एका कॉलमध्ये अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहूमधील पीव्हीआर आणि सांताक्रूझमधील फाइव्ह स्टार हॉटेल सहार यांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या 112 या हेल्पलाइन क्रमांकावर हा कॉल आला होता.