Chandrakant Patil : अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदींनीच राष्ट्रपती केलं; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 09:06 AM2021-02-20T09:06:19+5:302021-02-20T09:14:33+5:30
Narendra Modi did APJ Abdul Kalam as president he didn't let go Muslims said BJP leader Chandrakant Patil : नरेंद्र मोदी यांनी सर्व मुस्लिमांना प्राधान्य दिलं. त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, पाटील यांचं वक्तव्य
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम Abdul Kalam यांना राष्ट्रपती केलं होतं, असा दावा त्यांनी केला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात त्यांनी हे अजब वक्तव्य केलं.
"नरेंद्र मोदी यांनी सर्व मुस्लिमांना प्राधान्य दिलं. त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं. ते काय मुस्लीम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवलं नाही. एक कर्तुत्ववान म्हणून, एक संशोधक म्हणून त्यांना राष्ट्रपती केलं," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुस्लीम महिलांच्या पायात बेड्या होत्या. त्या तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाकचा कायदा केला. बिहारमध्ये निवडणुकांत जो विजय मिळाला त्याचं विश्लेषण करा. रांगेनं मुस्लीम महिलांनी मोदींना मतदान केलं. आमच्या पायातील बेडी तुम्ही तोडली. नाही तर आमचा पती तलाक म्हणून आम्हाला बाहेर काढायचा. तुम्ही कायदा केला असं तेथील महिला म्हणत होत्या. बिहारमध्ये मुस्लीम बहुल भागात२९ पैकी १४ जागांवर भाजपला विजय मिळाला. तर मुस्लीम महिलांनीही आपल्या पतीला सांगितलं तुम्हाला जे काही करायचं ते करा आम्ही मोदींनाच मतदान करणार आहोत, असं पाटील यांनी नमूद केलं.
महापुरुषांचं कर्तुत्व समजण्याची गरज
"छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या महापुरुषांचं कर्तुत्व समजून घेण्याची गरज आहे. समाजात असलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याचा तरुणांनी विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य लढ्यात तरूणांचं मोठं योगदान होतं. तसंच योगदान आजही युवकांनी द्यावं. या पिढीला खरा इतिहास सांगण्याचं तसंत इतिहास, राष्ट्र आणि संस्कृतीशी जोडण्याचं काम युवा मोर्चा करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.