कोकणने महायुतीला यश दिले; पण मंत्रिपदाने दिली हुलकावणी, विदर्भात फटका तरी दोघे झाले मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 06:45 AM2024-06-10T06:45:38+5:302024-06-10T06:46:36+5:30
Narendra Modi Oath Ceremony - लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कोकणने यावेळी चांगली साथ दिली; पण केंद्रीय मंत्रिमंडळात या विभागाला स्थान मिळू शकले नाही. त्या तुलनेने फटका बसलेल्या विदर्भाला मात्र दोन मंत्रिपदे मिळाली.
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कोकणने यावेळी चांगली साथ दिली; पण केंद्रीय मंत्रिमंडळात या विभागाला स्थान मिळू शकले नाही. त्या तुलनेने फटका बसलेल्या विदर्भाला मात्र दोन मंत्रिपदे मिळाली.
भाजपला यश न देणाऱ्या मराठवाड्याला मंत्रिपद मिळाले नाही. मात्र, भाजपसह महायुतीला दमदार यश मिळवून देणाऱ्या कोकणला एकही मंत्रिपद मिळाले नाही. पीयूष गोयल, रामदास आठवले (मुंबई), मुरलीधर मोहोळ (पुणे- पश्चिम महाराष्ट्र), रक्षा खडसे (उत्तर महाराष्ट्र) असा विभागीय न्याय देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळात करण्यात आला आहे.
कोकणातून नारायण राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), डॉ. हेमंत सावरा (पालघर), डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण), नरेश म्हस्के (ठाणे), सुनील तटकरे (रायगड) असे महायुतीचे पाच खासदार लोकसभेवर निवडून आले. फक्त भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला. उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील वर्चस्वाला महायुतीने दणका दिला. गेल्या वेळी राज्यसभेचे सदस्य असताना नारायण राणे कॅबिनेट मंत्री होते. यावेळी ते लोकसभेवर निवडून गेले; पण मंत्रिपदापासून वंचित राहिले. गेल्या वेळी राणे आणि कपिल पाटील असे कोकणातले दोन मंत्री केंद्रात होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना शिंदेसेनेकडून केंद्रात मंत्रिपदाची संधी होती; पण पक्षातील वरिष्ठांना संधी द्यावी. मी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटनेत काम करेल, असे त्यांनी जाहीर केले.
जातीय संतुलन असे
महाराष्ट्रातून ज्यांना संधी मिळाली त्यात दोन मराठा समाजाचे (प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ) दोन खुल्या प्रवर्गातील (नितीन गडकरी, पीयूष गोयल) एक ओबीसी रक्षा खडसे (माहेरच्या गुजर तर सासरच्या लेवा पाटील) आणि रामदास आठवले (अनुसूचित जाती) असे संतुलन केले आहे.
विदर्भाला दोन मंत्रिपदे
नितीन गडकरी (नागपूर) आणि प्रतापराव जाधव (बुलढाणा) अशा दोघांना मोदी मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. यापूर्वी गडकरी हे विदर्भातील एकमेव मंत्री होते. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पद मिळाले होते; पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे नंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. आता त्यांचे पुत्र अनुप हे अकोल्याचे खासदार झाले आहेत. विदर्भात गडकरी, जाधव आणि धोत्रे असे तिघेच महायुतीचे खासदार निवडून आले आणि त्यातील दोघे मंत्री झाले.
विदर्भाला दोन मंत्रिपदे मिळण्याची वेगळी कारणे देखील आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले तसेच भूपृष्ठ वाहतूकमंत्री म्हणून दमदार कामगिरी केलेले नितीन गडकरी यांचा मोदी तीन मंत्रिमंडळात समावेश होईल हे निश्चित मानले जात होतेच. त्यातच शिंदेसेनेत प्रतापराव जाधव हे सर्वांत वरिष्ठ खासदार होते. त्यामुळे त्यांना संधी मिळाली आणि महायुतीच्या पडझडीनंतरही विदर्भाला फायदा झाला.
अजित पवार गट वंचित
भाजपला राज्यात नऊ जागा मिळाल्या. त्यातील तिघे मंत्री झाले. शिंदे सेनेला सात जागा मिळाल्या त्यातील एक मंत्री झाले.
अजित पवार गटाला मात्र मोदी सरकारमध्ये तूर्त स्थान मिळालेले नाही. या गटाला लोकसभेच्या चार जागा लढायला मिळाल्या होत्या. त्यापैकी फक्त सुनील तटकरे विजयी झाले. प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांच्यापैकी एकाला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल, असे मानले जात होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही.
पटेल आणि तटकरे दोघेही वरिष्ठ नेते आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे अशी पक्षाची अपेक्षा होती. मात्र, अजित पवार गटाचे एकच खासदार निवडून आलेले आहेत. अशा वेळी एका खासदाराच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद दिले असते तर एकेक खासदार असलेले अन्य लहान मित्रपक्ष नाराज झाले असते. त्यामुळेच अजित पवार गटाला वंचित राहावे लागले, असे म्हटले जाते.
बुलढाण्याचा डबल धमाका
- बुलढाणा जिल्ह्याला एक प्रकारे दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. याआधी मुकुल वासनिक आणि आनंदराव अडसूळ हे बुलढाण्याचे खासदार असताना मंत्री झाले होते.
- यावेळी प्रतापराव जाधव, तर मंत्री झालेच शिवाय बाजूच्या रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे याही मंत्री झाल्या.
-खडसे यांच्या रावेर मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ येतो. बुलढाणा जिल्ह्याला एक प्रकारे डबल गिफ्ट मिळाले.
मराठवाड्याला शून्य
nमराठवाड्यातून गेल्या वेळी रावसाहेब दानवे आणि डॉ. भागवत कराड असे दोन राज्यमंत्री होते. यावेळी दानवे यांचा पराभव झाला. कराड यांना संधी मिळाली नाही.
nमराठवाड्यात भाजपचा दारुण पराभव झाला. या पक्षाला तेथे एकही जागा जिंकता आली नाही. औरंगाबादमध्ये शिंदेसेना जिंकली. ही एकच जागा महायुतीला मिळाली.
पुण्याच्या लाेकनियुक्त खासदाराला 28 वर्षांनी केंद्रात मंत्रिपद
पुणे : पुणे मतदारसंघातून भाजपचे मुरलीधर मोहोळ हे प्रथमच खासदार झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागली. पुण्याचे माजी खा. सुरेश कलमाडी १९९५-९६ या काळात रेल्वे राज्यमंत्री होते. त्यानंतर २८ वर्षांनी पुण्यातून निवडून गेलेली व्यक्ती केंद्रात मंत्री होत आहे. मूळचे पुण्याचे असलेले, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर हे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ साली पर्यावरणमंत्री होते; पण जावडेकर हे राज्यसभेतून खासदार झाले होते.