मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:57 AM2024-04-30T11:57:36+5:302024-04-30T11:59:41+5:30
Maharashtra Politics: शिंदे, पवार गुवाहाटीला जातात, त्यांना मोदींच्या रुपाने भटकता आत्मा मिळाला; राऊत यांचे जोरदार प्रत्यूत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शरद पवार यांच्यावर नाव न घेता भटकता आत्मा अशी टीका केली होती. यावरून मविआकडून आता प्रत्यूत्तर येऊ लागले असून संजय राऊत यांनी मोदींचाच एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे, अशी टीका केली आहे.
एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील. फुटलेले जे लोक आहेत त्यांचे काम गेल्या दोन वर्ष तुम्ही पाहिले असेल. गुवाहाटीला जातात, रेडे कापतात, जादूटोणा करतात, भटक्या आत्म्यांची पूजा केली जाते. त्यांना मोदींच्या रूपात एक भटकता आत्मा मिळाला आहे, असे जोरदार प्रत्यूत्तर राऊत यांनी दिले आहे.
प्रधानमंत्री जिकडे जातात तेथे फक्त काँग्रेसवर हल्ला करतात. महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला करतात. जसे मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजींचे घोडे दिसायचे तसे यांना आम्ही दिसतो. गुजरातच्या मुघलांना, दिल्लीच्या मुघलांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत, अशी जहरी टीका राऊत यांनी केली.
जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत अशा सर्वांचे आत्मे महाराष्ट्रात गेल्या चारशे वर्षांपासून भटकत आहेत. त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे. कालच्या भाषणात मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तरी केला का? असा सवाल करत राऊत यांनी आंबेडकर यांच्यावर त्यांचा राग आहे, त्यांना संविधान बदलायचे आहे, अशी टीका केली.
नसीम खान यांना विरोध नाही...
आम्ही नसीम खान यांना कधी विरोध केला नाही. जात आणि धर्म पाहून शिवसेना कधी विरोध करत नाही आणि करणार नाही. उलट नसीम खान हे वारंवार आम्हाला भेटत होते. ते तितकेच तोला मोलाचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी तयारी केली होती. शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. आता जर काँग्रेसला वाटत असेल, उमेदवारी बदलावी तो त्यांचा प्रश्न आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.