Narendra Modi: ११ डिसेंबरला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; दोन मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 03:24 PM2022-11-30T15:24:36+5:302022-11-30T15:25:53+5:30
मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या ५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्चाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळाने विविध १३ राष्ट्रीयीकृत बँकांकडून तब्बल २८ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे. याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची मागील अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती. त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग तयार असतानादेखील सुरू होत नसल्याने जनतेतूनच प्रश्न उपस्थित होत होते. जानेवारी महिन्यात पंतप्रधान इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या उद्घाटनासाठी नागपुरात येणार आहेत. तेव्हाच हे उद्घाटन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ११ डिसेंबरच्या तारखेला पंतप्रधानांकडून होकार देण्यात आला आहे.
महा मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नागपुरला येण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ नागपूर आणि पुणे मेट्रो तेच नाशिक मेट्रो निओच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे. उद्घाटनाअगोदर नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग पूर्णत: तयार होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष सह व्यवस्थापकीय संचालक (व्हीसीएमडी) राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.
तीन आठवड्यात दोनदा नागपूर दौरा
समृद्धी व मेट्रोच्या उद्घाटनाच्या तारखेने अधिकाऱ्यांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ३ जानेवारीला नागपुरात येणार आहेत. त्यावेळी समृद्धी आणि नागपूर मेट्रो सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी तीन आठवड्याच्या कालावधीत दोनदा शहरात येण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पंतप्रधान नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या फुटाळा येथील म्युझिकल फाऊंटनचे लोकार्पण करणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांसाठी खुला करण्यापूर्वी ते आणखी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.