नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, 5 वर्षांनी साईबाबांचे घेणार दर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 09:03 AM2023-10-26T09:03:16+5:302023-10-26T09:03:59+5:30

शिर्डी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे.

Narendra Modi will visit Shirdi today after 5 years, shri saibaba sansthan trust shirdi temple | नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, 5 वर्षांनी साईबाबांचे घेणार दर्शन!

नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, 5 वर्षांनी साईबाबांचे घेणार दर्शन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची सुरू असलेली जोरदार तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिर्डी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे.

नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन करणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. 5 वर्षांनी नरेंद्र मोदी साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेचे लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी एकच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचणार आहेत. साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन घेऊन, मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. दुपारी दोन वाजता, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करतील. 3.15 च्या सुमारास शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायू यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.

शिर्डीमधील नवीन दर्शनरांग संकुलाचे उद्घाटन
पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन होणारे शिर्डी येथील शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुल म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्याधुनिक अशी भव्य इमारत असून येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी आरामदायी प्रतिक्षालय बांधण्यात आले आहे. दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह या इमारतीत अनेक सुसज्ज प्रतिक्षालये आहेत. यामध्ये कपडे बदलण्यासाठी खोल्या, स्वच्छतागृह, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्र इत्यादी वातानुकूलित सार्वजनिक सुविधांची तरतूद आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर 2018 मध्ये या दर्शन रांग संकुलाची पायाभरणी झाली होती.

निळवंडे धरणाचे जलपूजन डाव्या कालव्याचे लोकार्पण
शिर्डी संस्थानचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या काठाच्या (८५ किमी) कालव्याचे जाळे देशाला समर्पित करणार आहेत. यामुळे पाण्याचे पाइप वितरण जाळे सुकर होईल व सात तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) 182 गावांना याचा लाभ होणार आहे. यासाठी सुमारे 5177 कोटी रुपये निधी खर्च करण्यात येत आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्यात येणार आहे.

आयुष्मान आणि स्वामित्व कार्डचे वाटप मोदींच्या हस्ते होणार
याचबरोबर, अहमदनगर शासकीय रुग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी); जळगाव ते भुसावळ जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी), एनएच-166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा आदी प्रकल्पांचे उद्घाटन तसेच माता व बाल आरोग्य शाखेची पायाभरणी, आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
 

Web Title: Narendra Modi will visit Shirdi today after 5 years, shri saibaba sansthan trust shirdi temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.