नरेंद्र मोदींचं मार्केटिंग जोरात, प्रॉ़डक्टचा मात्र पत्ता नाही - पवार
By Admin | Published: November 19, 2014 02:28 PM2014-11-19T14:28:18+5:302014-11-19T14:28:18+5:30
नरेंद्र मोदींचं प्रॉडक्ट काय आहे ते माहित नाही परंतु मार्केटिंग मात्र जोरात आहे, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली आहे
>ऑनलाइन टीम
अलिबाग, दि. १९ - नरेंद्र मोदींचं प्रॉडक्ट काय आहे ते माहित नाही परंतु मार्केटिंग मात्र जोरात आहे, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चिंतन शिबिरात बोलताना पवारांनी राज्यातल्या स्थितीवर भाष्य केले असले तरी जाता जाता नरेंद्र मोदींच्या मार्केटिंग करण्याच्या शैलीवर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अवघ्या ४१ जागा मिळाल्याचा संदर्भ देताना पवार म्हणाले की विकासकामं केली की त्याचं फळ मिळतं यावरचा विश्वास उडाला आहे. असे असले तरी विकासकामांवर आपला भर राहील अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
भारतीय जनता पार्टीचे सरकार फार काळ टिकणार नाही आणि निवडणुका मुदतपूर्व होतील असे भाष्य करून खळबळ उडवणा-या पवारांनी आपले वक्तव्य आज बोलताना मागे घेतले नसले तरी आपल्याला पाडापाडीमध्ये रस नाही असेही सांगून त्यांनी राजकीय विश्लेषकांना बुचकळ्यात टाकले आहे. सरकार पाडण्यात आपल्याला रसनसला तरी सरकार अयोग्य वाटत असेल तर आपण प्राणपणाने विरोध करू नी वेळ पडली तर रस्त्यावर उतरू असे ते म्हणाले.
चिंतन शिबिरात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपाला पाठिंबा देणे ही चूक होती असे मत सांगून या मुद्यावर पक्षामध्ये एकमत नसल्याचे सूचित केले आहे. मात्र, सगळ्यांनी चर्चा करून विचार विनिमय करूनच हा निर्णय घेतला होता असे सांगून यावर पडदा टाकला आहे.
यश न मिळालेल्या २४१ मतदारसंघामध्ये पक्षाला कसे वाढवायचे हा मुख्य प्रश्न असल्याचे पवार म्हणाले, तसेच पक्षामध्ये सुसंवाद वाढला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.