नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 04:56 PM2021-11-22T16:56:12+5:302021-11-22T16:56:32+5:30
Narendra Patil News: नॅशनल फिशवर्कर्स फोरम या राष्ट्रीय मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष, जागतिक मच्छीमार संस्थेचे सदस्य,जेष्ठ मच्छिमार नेते नरेंद्र उर्फ नंदू पाटील (७०) यांचे आज दुपारी वसई येथील खाजगी इस्पितळात निधन झाले.
मुंबई - नॅशनल फिशवर्कर्स फोरम या राष्ट्रीय मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष, जागतिक मच्छीमार संस्थेचे सदस्य,जेष्ठ मच्छिमार नेते नरेंद्र उर्फ नंदू पाटील (७०) यांचे आज दुपारी वसई येथील खाजगी इस्पितळात निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांची अंतिम संस्कार यात्रा त्यांच्या राहते घर मु.पो. सातपाटी, जि. पालघर येथून आज संध्याकाळी ०७.०० वाजता निघेल.
महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे माजी सरचिटणीस व जेष्ठ सल्लागार, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान कार्यकारीणि सदस्य,अखिल वैती समाज संस्थेचे अध्यक्ष, सोनोपंत दांडेकर शिक्षण समितीचे उपाध्यक्ष, सातपाटी गावाचे माजी सरपंच, अश्या विविध पदावर काम केले होते.
नरेंद्र पाटील हे मच्छिमारांचे झुंजार व लढवय्ये नेते होते. त्यांच्या मृत्यूने देशातील मच्छिमार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे अश्या शब्दात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व सरचिटणीस किरण कोळी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मच्छिमारांचे झुंजार नेतृत्व हरपले : आमदार रमेश पाटील
मच्छिमार समाजाचे ज्येष्ठ नेते, पालघर जिल्ह्याचे सुपुत्र व एनएफएफचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपा विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना कोळी महासंघ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नरेंद्र पाटील हे मच्छीमारांच्या उन्नती करता गेल्या अनेक वर्षापासून सतत काम करत होते. त्यांनी प्रत्येक वेळी मच्छिमार समाजाचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मच्छीमारांच्या अनेक समस्यांबाबत व प्रश्नासंदर्भात यांनी राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय मच्छीमारांचा विकास करणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हेच होते.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी बंदर हे नरेंद्र पाटील यांच्यामुळेच प्रसिद्ध झाले. आज त्यांच्या जाण्याने मच्छीमार समाजाचे व पालघर जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले असल्याचे सांगून मच्छीमारांचा हिरा काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केल्या.