PM नरेंद्र मोदींसमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख; नेमकं काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 02:22 PM2024-01-19T14:22:46+5:302024-01-19T14:23:51+5:30
या भाषणाच्या सुरुवातीलाच आडम मास्टरांकडून झालेल्या चुकीचा उल्लेख सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूरात १५ हजार घरांचं लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ५ महिला लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात घरे देण्यात आली. ५ वर्षापूर्वी मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या या प्रकल्पाचं आज पंतप्रधान मोदींनीच लोकार्पण केले. या कार्यक्रमावेळी मंचावर या प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांचंही भाषण झालं. या भाषणाच्या सुरुवातीलाच आडम मास्टरांकडून झालेल्या चुकीचा उल्लेख सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात आडम मास्टरांनी चक्क उद्धव ठाकरेंचे नाव घेतले.
आडम मास्टर जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा ते म्हणाले की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे...असा उल्लेख केल्यानंतर तातडीने ही चूक त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर माफ करा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे कायम येतात त्यामुळे ते माझ्या तोंडी बसलंय असं सांगत मी माफी मागतो असं ते बोलले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सर्वांचे त्यांनी स्वागत केले.
तसेच सोलापुरातील यंत्रमागधारकांना मिलट्रीच्या कपड्याचे काम देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची विनंती आडम मास्टरांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे केली. शिवाय विडी कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन सुरू करावी, नवीन घरासाठी दोन लाखाची सबसिडी द्यावी, सोलर प्रकल्प द्यावेत, तसेच, आपण घर नाही बंगला दिला असे म्हणत मास्टरांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले. ५ वर्षापूर्वी याच ठिकाणी प्रकल्पाचे भूमिपूजन मोदींनी केले होते. त्यानंतर आज ते स्वत: या घरांच्या चाव्या देण्यासाठी इथं सोलापूरात आले आहेत.
...अन् पंतप्रधान मोदी भावूक झाले
या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचे दिसून आले. सर्व सामान्य कष्टकरी लोकांना घर किती महत्वाचे असते याची जाणीव मला आहे. आज जे घर तुम्हाला मिळत आहे, ते पाहून मला असे वाटते की कदाचित मीही लहानपणी अशा घरात राहिलो असतो तर असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावूक झाले आणि त्यांचा बोलताना अचानक आवाज बदलला अन त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.