नाशिकमधील कलाकारानं 11 हजार छोट्या गणेशमूर्तींपासून साकारला 18 फूट लांबीचा महागणपती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 11:10 AM2017-08-24T11:10:02+5:302017-08-24T11:23:00+5:30
नाशिक शहरातील हरहुन्नरी कलाकार संजय क्षत्रिय यांनी तब्बल 11 हजार छोट्या गणेशमूर्तींपासून सुमारे 18 फूट लांबीचा महागणपती साकारला आहे.
शैलेश कर्पे/सिन्नर(नाशिक), दि. 24 - नाशिक शहरातील हरहुन्नरी कलाकार संजय क्षत्रिय यांनी तब्बल 11 हजार छोट्या गणेशमूर्तींपासून सुमारे 18 फूट लांबीचा महागणपती साकारला आहे. क्षत्रिय यांनी वीस वर्षांमध्ये तीन इंच उंचीच्या तब्बल 33 हजार गणेशमूर्ती घडवल्या. यापैकी 11 हजार गणेशमूर्तींचा त्यांनी महागणपती साकारण्यासाठी समावेश केला. रंगकाम करणाऱ्या क्षत्रिय यांना शाडू मातीपासून छोट्या गणेशमूर्ती घडवण्याचा छंद आहे. त्यांच्या या छंदामध्ये त्यांना पत्नी व दोन मुलींचेही सहकार्य लाभले आहे. 11 हजार गणेशमूर्तींपासून घडवण्यात आलेला हा महागणपती पाहण्याकरीता लोकांची याठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे.
टाकाऊपासून टिकाऊ मखरांचा बाप्पाला साज, अनेक कलाकारांना ऑनलाइन प्लॅटफार्म
संजय क्षत्रिय यांच्याप्रमाणेच मुंबईतील हॉबी आयडियाज एक्सपर्ट्स टीमनंही गणेशोत्सवानिमित्त अनोखी कल्पना समोर आली आहे. रद्दीच्या दुकानात आढळणा-या विविध वस्तूंचा वापर करत, गणपतीसाठी मखरे, सजावटीचे साहित्य, गणपतीच्या आणि मखराच्या पाठीमागे करता येईल, अशी सजावट मुंबईतील अंधेरी येथील ‘हॉबी आयडियाज एक्सपर्ट्स’ या टीमने तयार केल्या आहेत. याबाबत संकेतस्थळावर अपलोड केलेल्या व्हिडीओंना आतापर्यंत लाखांच्या वर लोकांनी पसंती दर्शविली आहे.
अडीच वर्षांपूर्वी कला क्षेत्रातील १२ तज्ज्ञ महिला आणि ६ क्रिएटिव्ह लोकांची टीम एकत्र येत, त्यांनी शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी कार्यशाळा सुरू केली. या कार्यशाळेत नवनव्या शोभेच्या वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या जातात. देशभरातील अनेक कल्पक कलाकारांना या टीमने एक आॅनलाइन प्लॅटफार्म तयार करून दिला आहे. वर्तमानपत्रांचा वापर करून, या टीमने मखर तयार केले आहे. या मखराला नेटिझन्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जात आहे. सर्वांनी थर्माकोलचे मखर खरेदी करण्यापेक्षा, घरीच असे मखर तयार करावे, यासाठी ही टीमचा प्रयत्नशील आहे. हे मखर किमान पाच वर्षे टिकेल, असा टीमने दावा केला आहे, तर मखराच्या सजावटीसाठी वापरल्या जाणाºया इलेक्ट्रिक लाइट्सनाही अधिक सुशोभित करण्यासाठी द्रोणाचा वापर या टीमने केला आहे. टॉयलेटपेपरच्या रोलपासून टीमने गणपतीजवळ लावण्यासाठी रंगीबेरंगी छत्र तयार केले आहे, अशा छत्रामध्ये दिवा, बल्बही लावू शकतो.
या ग्रुपची क्रिएटिव्ह टीम वर्षभर जगभरातील मार्केटमधील ट्रेंड्सचा अभ्यास करते. त्यानुसार, विविध वस्तू तयार केल्या जातात. यानुसार, यंदा जागतिक बाजारपेठांमध्ये कोरल रेड, साल्मन पिंक, ग्रीनरी, टील ब्लू या रंगांना, तसेच या रंगाच्या वस्तू आणि कपड्यांना अधिक मागणी आहे. त्यामुळे यंदा तयार केलेल्या सर्वच वस्तूंवर या रंगांचा प्रभाव आहे.
गृहिणींसह सर्वांना कामाच्या संधी
टीमच्या संकेतस्थळावरील व्हिडिओ पाहून वस्तू तयार करून, संकेतस्थळाच्या माध्यमातून त्याची विक्री करण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्यातील सृजनशक्तीचा वापर करून, कोणत्याही शोभीवंत वस्तू तयार कराव्यात, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार कराव्यात आणि त्या आॅनलाइन विकून पैसे कमवा, असे आवाहन टीमने केले आहे. त्यासाठी लागेल ते मार्गदर्शन आम्ही करू, असेही टीमने सांगितले.