नाशिक : रुग्णालयातील बालमृत्यू संसर्गामुळे! ‘खासगी’वर ठपका : आरोग्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:02 AM2017-09-09T04:02:32+5:302017-09-09T04:02:37+5:30
नाशिक जिल्हा रुग्णालयात महिनाभरात ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने झाल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जबाबदारी झटकली आहे.
नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात महिनाभरात ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण वाढल्याने झाल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जबाबदारी झटकली आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल एकूण बालकांपैकी ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील होती, असेही ते म्हणाले.
नवजात कक्षातील ९० टक्के बालकांचे वजन कमी असते. ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात. त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली. एनआयसीयूमध्ये अर्भकांची विशेष काळजी घेतली जाईल. उपजत मृत्यू कमी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील ३६ एनआयसीयूमध्ये जव्हार, गडचिरोली व नाशिकचा समावेश आहे. त्यात ६०० ते १००० ग्रॅम वजनापर्यंतच्या गुंतागुंतीच्या आजाराने त्रस्त असलेल्या बालकांना बरे करण्यात शासकीय रुग्णालयांना यश प्राप्त झाले आहे. अकाली जन्मलेली, कमी वजनाची बालके यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने अर्भकांना पटकन जंतुसंसर्ग होतो, असेही डॉ. सावंत म्हणाले.