नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:00 IST2024-04-30T10:59:56+5:302024-04-30T11:00:15+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील राऊड घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी येत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील राऊड घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. ट्रकला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चांदवड जवळच्या राऊड घाटात हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी रवाना झाले. भीषण अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राहुड घाटात नेहमी अपघात होत असतात. त्यात हा मोठा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहे.