नाशिकच्या बालिकेचे हृदय धडधडणार मुंबईत तर पुणे, नाशिकमध्येही थांबणार तीघांचा मृत्यूशी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 02:19 PM2017-09-20T14:19:42+5:302017-09-20T14:32:47+5:30
नाशिक : ‘अवघा महराष्ट फुटबॉल’मय अंतर्गत खेळाच्या तासिकेसाठी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावातील प्राथमिक जनता विद्यालयाच्या प्रारंगणात खेळताना भोवळ येऊन सहावीच्या वर्गात शिकणारी तेजश्री कोसळली. यामुळे तीची प्रकृती बिघडली शिक्षकांनी पालकांना कळवून तत्काळ तिला रुग्णालयात हलविले; मात्र मेंदूला रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिनीत बिघाड झाल्यामुळे ती काही तासानंतर ‘कोमा’मध्ये गेली. मंगळवारी डॉक्टरांनी तीला मेंदू मृत घोषित केले. तेजश्री रमेश शेळके (११) असे शाळकरी मुलीचे नाव आहे. तिचे वडील, आजोबा व चुलत्यांनी तीने जग बघावे, या उदात्त उद्देशाने अवयवदान करण्याचा निर्णय डॉक्टरांना स्वयंस्फूर्तीने बोलून दाखविला. ‘समृध्दी’बाधित शिवडे गावाचे शेतकरी शेळके कुटुंबियांचा हा निर्णय चौघांना नव आयुष्य व दोघादृष्टीबाधितांना दृष्टी देऊन जाणारा ठरला आहे. तेजश्रीचे हृदय ग्रीन कॉरिडोर’द्वारे मुंबईला तर यकृत पुणे आणि एक मुत्रपिंड सोलापूरला बुधवारी रवाना झाले.
तेजश्री ही मुळ शिवडे गावातील शेळके या शेतकरी कुटुंबाची मोठी मुलगी. तिच्या पश्चात आई, वडील, आजी-आजोबा, भाऊ, बहीण, काका-काकू, चुलते असा मोठा परिवार आहे. फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात येण्याचे निमित्त झाले आणि तिला भोवळ आली. यामुळे ती जमिनीवर कोसळली. उपचारार्थ तिला रुग्णालयात हलविले; मात्र दुर्देवाने मेंदूला रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिनीत बिघाड झाल्याने तिची प्राणज्योत मालवली. नाशिकच्या आडगाव येथील वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयात डॉक्टरांनी तेजश्रीला मेंदू मृत घोषित केले. यानंतर तीचे वडील रमेश आई ज्योती व आजोबा बबन शेळके, चुलते दत्तू शेळके आदिंनी अवयवदानाचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला.
‘ग्रीन कॉरिडोर’साठी नाशिक शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सहकार्य करत पोलीस आयुक्तालय हद्दीपर्यंत अवयव घेऊन जाणाºया रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करुन देत पायलट व्यवस्था पुरविली. तसेच तेथून पुढे नाशिक ग्रामिण पोलिसांनी कॉरिडॉरची धुरा स्विकारली.
२४ नव्हे तर ४८ तासानंतर प्रक्रिया
ज्योतीने नुकतेच जग बघण्यास सुरूवात केली होती. वयाच्या अकराव्या वर्षी तीचे दुर्देवी निधन झाल्यामुळे ती अवयवरुपाने आपल्यामध्ये राहील आणि तिच्या अवयांमुळे इतरांचा मृत्यूशी सुरू असलेला लढा थांबण्यास यश येईल, या हेतूने त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय वैद्यकिय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनास बोलून दाखविला. निर्णय सांगितल्यानंतर २४ नव्हे तर ४८ तास उलटून गेल्यानंतर अवयव शस्त्रक्रियेची मान्यता असलेल्या खासगी रुग्णालयात तेजश्रीचा मृतदेह हलविण्यात आला आणि आज सकाळी शस्त्रक्रियेद्वारे तिचे अवयव काढून ‘ग्रीन कॉरिडोर’ने गरजूंपर्यंत संबंधित रुग्णालयात पोहचविले गेले. अवयवदान चळवळीला बुस्ट मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न जरी होत असले तरी वैद्यकिय प्रक्रियेसाठी लागणारा उशीर व योग्य मार्गदर्शनाअभावी ही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. दोन दिवस होऊनही बालिकेला घरी का आणले नाही? असा एकच प्रश्न घरी तिच्या अखेरच्या दर्शनासाठी जमलेल्या नातेवाईक सातत्याने विचारत असल्याचे तिचे वडील रमेश व आजोबा बबन यांनी सांगितले यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.