नाशिक - कुंभमेळ्याच्या मंगलपर्वाची उद्या होणार सांगता

By Admin | Published: August 10, 2016 05:02 PM2016-08-10T17:02:21+5:302016-08-10T17:51:38+5:30

शैव आणि वैष्णव पंथीय साधूंची मांदियाळी ठरणाऱ्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंंहस्थ कुंभमेळ्याची सांगता सोहळ्याची घटिका समीप आली आहे.

Nashik - Kumbh Mela will be held on Tuesday | नाशिक - कुंभमेळ्याच्या मंगलपर्वाची उद्या होणार सांगता

नाशिक - कुंभमेळ्याच्या मंगलपर्वाची उद्या होणार सांगता

googlenewsNext

- संजय पाठक

नाशिक, दि. 10 -  शैव आणि वैष्णव पंथीय साधूंची मांदियाळी ठरणाऱ्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंंहस्थ कुंभमेळ्याची सांगता सोहळ्याची घटिका समीप आली आहे. गेले वर्षभर साधू-महंतांची पेशवाई आणि शाहीस्नान तसेच धर्मजागर यामुळे निर्माण झालेल्या मांगल्याच्या वातावरणाची सांगता गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झाली आणि आता सिंह राशीतून गुरू कन्या राशीत पदार्पण करत असताना गुरुवारी सिंहस्थ पर्वाची समाप्ती होणार आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्याच्या आठवणी मात्र नागरिकांच्या स्मरणात राहणार आहेत. उद्या गुरुवारी (दि. ११) रात्री ९.३१ वाजता सिंह राशीत असलेला गुरू कन्या राशीत प्रवेश करणार असून त्याचवेळी सिंहस्थ कुंभमेळा समाप्तीची घोषणा होईल.
समुद्रमंथनातून बाहेर पडलेला अमृतकुंभ प्राप्त करून घेण्यासाठी देव आणि दानव यांच्यात संघर्ष झाला. यावेळी जे चार थेंब अमृतकुंभातून हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सांडल्याने या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. नाशिकच्या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सिंह राशीत गुरू प्रवेश करतो त्यावेळी पर्वकाळास प्रारंभ होत असल्याने त्यास सिंहस्थ कुंभमेळा असे म्हटले जाते. गेल्या वर्षी १४ जुलैला सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी सिंहस्थ कुंभपर्वास प्रारंभ झाला. नाशिकला गोदाकाठी रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर त्र्यंबकेश्वरी श्री कुशावर्त तीर्थावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत धर्मध्वजा फडकविण्यात आली आणि त्याबरोबरच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कुंभपर्वास प्रारंभ झाला. नाशिकमध्ये वैष्णव पंथीय, तर त्र्यंबकेश्वर येथे शैव पंथीय साधूंच्या आगमनाला त्यानंतरच प्रारंभ झाला आणि नाशिकला एकाच दिवशी १९ आॅगस्टला आखाड्यांचे धर्मध्वजारोहण करण्यात आले, तर त्र्यंबकेश्वरी वेगवेगळ्या दिवशी पेशवाई केली आणि साधू-महंतांच्या आगमनाने दोन्ही ठिंकाणी अत्यंत धार्मिक वातावरण निर्माण झाले. नामसंकीर्तन, प्रवचने, चर्चा अशा धार्मिक चर्चांनी अखंड सुरू असलेल्या धर्मजागराचा कळस शाहीस्नानांनी घातला गेला.
प्रत्येक आखाड्याच्या असलेल्या आराध्य देवतांची वाजत गाजत मिरवणूक काढून स्नानासाठी जाणे हा साराच शाही सोहळा असतो. नाशिकमध्ये तपोवनातू न रामकुंड तर त्र्यंबकेश्वरी नीलपर्वतीच्या पायथ्यापासून कुशावर्त तीर्थावर निघणाऱ्या या मिरवणुका यंदाही लक्षवेधी ठरल्या, परंतु थरारक खेळ आणि कसरती तसेच महंतांच्या आशीर्वचनाची कृपादृष्टी व्हावी यासाठी जगभरातून आलेल्या लाखो भाविकांनी शाही मिरवणूक आणि स्नानाचे सोहळे डोळ्यात साठवले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २९ आॅगस्ट तर १३ सप्टेंबर या दोन दिवस सामाईक तर अखेरच्या पर्वण्या स्वतंत्र होत्या. नाशिकमध्ये वैष्णव पंथीयांचे तीन आखाडे आणि सुमारे साडेसहाशे खालसे तर त्र्यंबकेश्वरमध्ये दहा आखाड्यातील साधू विशेषत: नागा साधूंच्या सहभागाने पार पडलेल्या या सर्वच पर्वण्या पारणे फेडणाऱ्या ठरल्या.
साधू-महंतांच्या पेशवाईपासून बिदाई पर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीत अवघा चैतन्योत्सवच होता. अन्य तीन ठिकाणांपेक्षा नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा हा पावसाळ्यात असल्याने प्रशासनाला कुंभमेळ्याच्या सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान होते; मात्र शासन आणि प्रशासन यांनी ते लीलया पेलले अर्थातच, नियोजनात पर्वणीच्या तीन दिवस घालण्यात आलेले अतिरेकी निर्बंध टीकेचे धनी ठरले. पहिल्या पर्वणीला भाविकच न आल्याने कर्फ्युमेळा म्हणून जोरदार टीका झाल्यानंतर निर्बंध शिथिल झाले आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीला जनसागर लोटला. सिंहस्थाच्या चैतन्यदायी मंगल आठवणींबरोबरच या कटू आठवणी संग्रही ठेवून या पर्वाला निरोप द्यावा लागणार आहे.
गुरुवारी (दि. ११) रात्री ९.३१ वाजता सिंह राशीत असलेला गुरू कन्या राशीत प्रवेश करणार असून त्याचवेळी सिंहस्थ कुंभमेळा समाप्तीची घोषणा होईल. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारी सायंकाळपासूनच धार्मिक विधी होणार असून दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हजेरी लावणार आहेत.
 

Web Title: Nashik - Kumbh Mela will be held on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.