नाशकात उत्तर महाराष्ट्रातील पहिले स्वयंसाहाय्य विद्यापीठ
By admin | Published: July 12, 2016 03:35 AM2016-07-12T03:35:04+5:302016-07-12T03:35:04+5:30
संदीप तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र अशा तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या माध्यमातून येथील शिक्षण क्षेत्रात प्रवेश
नाशिक : संदीप तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र अशा तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या माध्यमातून येथील शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या संदीप फाउंडेशनने येथील शैक्षणिक प्रगतीत मोलाचा टप्पा गाठत स्वयंसाहाय्यता विद्यापीठाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संदीप विद्यापीठाला मान्यता मिळाली असून, विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. व्ही. बी. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
संदीप फाउंडेशनतर्फे स्थापना झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांत दोन अभियांत्रिकी, दोन तंत्रनिकेतन, एक औषधनिर्माण शास्त्र व व्यवस्थापन महाविद्यालयातून पुणे विद्यापीठांतर्गत ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. ही सर्व महाविद्यालये पुणे विद्यापीठांतर्गत सुरू राहणार असल्याचेही झा यांनी सांगितले.
मुंबईतून १९९२ साली संदीप अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील वाटचाल उत्तर महाराष्ट्रातील विद्यापीठापर्यंत येऊन पोहोचली असून, विद्यापीठाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रास आवश्यक असलेले कु शल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे या विद्यापीठाचे उद्दिष्ट असणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी फाउंडेशनचे मार्गदर्शक प्रा. पी. आय. पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. आर. जी. तोताड, प्राचार्य एस. टी. गंधे आणि प्रशांत पाटील व आर्यन झा आदी उपस्थित होते.
विद्यापीठात पहिल्या शैक्षणिक वर्षासाठी कायदा, व्यवस्थापन, निसर्ग व जैवविज्ञान, मानवी विज्ञान व वाणिज्य आदी शाखांचे पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे, तर आगामी काळात डिझाईन, अच्युरिअल, नॅनो टेक्नोलॉजी, बायो टेक्नोलॉजी, इथिकल हॅकिंग, क्लाउड कम्प्युटिंग आदी अभ्यासक्रमांसह स्थानिक उद्योगासाठी आवश्यक असलेले वाहन टेक्नोलॉजी व शुगर टेक्नॉलॉजीसारखे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याची माहिती झा यांनी दिली. (वाणिज्य प्रतिनिधी)