आठ वर्षांपुर्वी झालेल्या पुण्याच्या हडपसरमधील युवतीच्या ‘मर्डर मिस्ट्री’चे गुढ नाशिक पोलिसांनी केले उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 08:39 PM2017-10-14T20:39:47+5:302017-10-14T20:44:14+5:30
नाशिक : पुणे-संगमनेर रस्त्यावरील चंदनापुरी घाटात २००८ साली झालेल्या तरुणीच्या खुनाचा उलगडा नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.१३) केला. या गुन्ह्यातील दोन्ही मित्रांना पोलिसांनी अटक करून संगमनेर तालुका पोलिसांच्या हवाली केले आहे. गुन्ह्यातील एका संशयिताने मयत तरुणीसोबत पळून जाऊन विवाह केला होता, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार नाशिकचे प्रतीक राजेंद्र धरणे (मूळ रा. सिडको) व विनित पुंडलिक झाल्टे (३०, साईसमर्थ रो-हाउस, दत्तचौक, सिडको) हे दोघे मित्र पुण्यात एका सदनिकेत राहत होते. प्रतीकचे हडपसर येथील रहिवासी असलेल्या अर्चना सोनवणे नावाच्या युवतीशी प्रेमसंबंध होते. त्याने अर्चनाला पळवून नेत आळंदीला विवाह केला होता. विवाहनंतर तो अर्चनासोबत आणि मित्र विनित आणि त्याचा मामा चंद्रकांत माधवराव पिंपळसकर (३५, रा.हडपसर) असे हे चौघे एकाच सदनिकेत वास्तव्यास होते. दरम्यान, विनित आणि अर्चनाचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रतीक आणि अर्चनामध्ये वादविवाद झाला. दरम्यान, हे तिघे अर्चनाला घेऊन नाशिककडे निघाले असता चंदनापुरी घाटात थांबले. यावेळी तिघांपैकी एकाने अथवा तिघांनी मिळून अर्चनाचा ओढणीने गळा आवळून हत्त्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण प्रतीक आणि विनित दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर दोघांनी एकमेकांवर अर्चनाचा खून केल्याचा आरोप केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोली आयुुुक्त अशोक नखाते यांनी सांगितले. गुन्ह्यात नेमका कोणाचा सहभाग आहे, की तिघांनी मिळून कट रचला? या दिशेने संगमनेर पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. शनिवारी (दि.१४) गुन्हे शाखेने सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून दोघा संशयित आरोपींना संगमनेर पोलिसांच्या हवाली केले आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरिक्षक विसपुते, सचिन सावंत, पोलीस उपनिरिक्षक भिमराव गायकवाड, पोलीस नाईक संजय गामणे, रेखा गायकवाड अदिंचा समावेश आहे.