नाशिक मुस्लीम मोर्चा : ‘शरियत’मध्ये महिला सुरक्षित; प्रवचन सभेत महिला धर्मगुरूंचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 09:41 PM2018-03-31T21:41:58+5:302018-04-01T01:15:07+5:30
निमित्त होते, तिहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी शरियत बचाव समितीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या समारोपाचे. समारोपप्रसंगी शहाजहांनी ईदगाह मैदानावर धार्मिक प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी सर्वांगीण विचार करून तयार केली आहे. धर्मग्रंथ कुराणचा या शरियतला भक्कम असा आधार आहे. त्यामुळे महिलांसह सर्व मानवजातीचे हक्क शरियतमध्ये सुरक्षित आहे, असा सूर ईदगाह मैदानावरील प्रवचन सभेतून उमटला.
निमित्त होते, तिहेरी तलाक विधेयक रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी शरियत बचाव समितीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या समारोपाचे. समारोपप्रसंगी शहाजहांनी ईदगाह मैदानावर धार्मिक प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेपर्यंत मुस्लीम महिला धर्मगुरू आलेमा सादेका, आलेमा निलोफर, आलेमा फरहत यांनी प्रवचनाद्वारे उपस्थित हजारो महिलांच्या जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘तलाक संकल्पना अन् इस्लाम’, ‘इस्लामी शरियत आणि महिला हक्क’ या विषयावर प्रवचनातून प्रकाश टाकला. याप्रसंगी आलेमा निलोफर म्हणाल्या, इस्लामी शरियत ही महिलांसह संपूर्ण मानवजातीच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करते. शरियत ही धर्मग्रंथ कुराणच्या आधारे मुहम्मद पैगंबरांनी रचली आहे. त्यामुळे या शरियतमध्ये कोणालाही कसल्याहीप्रकारे हस्तक्षेप करण्याचा अधिकार मुळीच नाही. तलाक संकल्पना धर्माने अत्यंत व्यापक पद्धतीने मांडली आहे. तिहेरी तलाक किंवा तलाक या संकल्पनेला शरियतनेदेखील नापसंत ठरविले आहे. तलाक होऊ नये, याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला जावा, असे शरियत म्हणते; मात्र ज्यावेळी कुठलाही पर्याय व तडजोडअंती केलेले प्रयत्न फोल ठरले त्यावेळी तलाकचा पर्याय वापरावा. आलेमा सादेका यांनीही तिहेरी तलाक संकल्पना व्यापक पद्धतीने विशद केली. त्या म्हणाल्या, ‘तिहेरी तलाक’ हा मीडियामार्फत सरकार व काही इस्लामविरोधी संघटनांनी चुकीच्या पद्धतीने जनसामान्यांमध्ये पोहचविला. त्यामुळे तिहेरी तलाक हा महिलांवर अन्यायकारकच आहे, असा गैरसमज झाला. मुळात तिहेरी तलाक संकल्पना ही अत्यंत टोकाची असून, एकदा तरी ‘तलाक’ म्हटले तरी तलाक शरियतमध्ये होतो, असे त्या म्हणाल्या.
ईदगाह मैदान हाऊसफुल्ल
शहरात प्रथमच मोठ्या संख्येने मुस्लीम महिला मोर्चाद्वारे रस्त्यावर उतरल्याचे चित्र शनिवारी दुपारी पहावयास मिळाले. दुपारी साडेचार वाजेपर्यंत ईदगाह मैदान बुरखाधारी महिलांनी हाऊसफुल्ल झाले होते. महिला धर्मगुरूं चे प्रवचन सुरू असताना महिला शांतपणे रणरणत्या उन्हात बसून होत्या. मैदानावर पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली होती. केवळ सेवेकरी पुरुषांनाच मैदानात प्रवेश दिला जात होता.