नाशिकमध्ये ओसरली माणुसकी; भिंत ओस
By admin | Published: March 14, 2017 04:54 AM2017-03-14T04:54:20+5:302017-03-14T04:54:20+5:30
नागपूर येथे सुरू झालेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमापासून प्रोत्साहित होऊन नाशिकमधील काही मंडळांनी शहरात माणुसकीची भिंंत उभी केली
संदीप भालेराव, नाशिक
नागपूर येथे सुरू झालेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमापासून प्रोत्साहित होऊन नाशिकमधील काही मंडळांनी शहरात माणुसकीची भिंंत उभी केली. मात्र अल्पावधीतच नाशिककरांनी या भिंतीकडे पाठ केली असून, दुसऱ्याला उपयोगात येतील अशा वस्तूंऐवजी या ठिकाणी अडगळीचे साहित्य आणि कपड्यांच्या चिंध्या टाकल्या जात आहेत. काही ठिकाणी तर भिंत केव्हाच गायब झाली आहे. जेथे भिंत टिकून आहे तेथे नाशिककरांची माणुसकी ओसरल्याने की काय सध्या माणुसकीची भिंत ओस पडली आहे.
मागील वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दानशूर नाशिककरांच्या भरवशावर काही सामाजिक संस्थांनी ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू केला. आपल्या घरातील वापरात नसलेले, परंतु चांगल्या स्थितीतील कपडे, वस्तू या ठिकाणी आणून द्यायच्या आणि ज्या गरजूंना त्या वस्तू उपयुक्त असतील त्यांनी त्या घेऊन जायच्या’ असा या भिंतीमागचा उद्देश. शहरातील केटीएचएम महाविद्यालय उड्डाणपुलाखाली, गोल्फ क्लबची संरक्षक भिंत तसेच नाशिक रोडला काही ठिकाणी ठरावीक भिंत ‘माणुसकीची भिंत’ म्हणून रंगविण्यात आली. या ठिकाणी नको असलेले कपडे अडकविण्यास हॅँगर्स लावले. महिला, पुरुष आणि लहान मुले यांच्यासाठीच्या कपड्यांसाठी स्वतंत्र हॅँगर्स लावले आहेत. त्यावेळी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अवघ्या चार-पाच महिन्यांपासून या भिंती ओस पडल्याचे चित्र आहे.
गोल्फ क्लबजवळची भिंत तर गायबच झाली आहे. या ठिकाणची पाटीही पुसली गेली आहे. केटीएचएम उड्डाणपुलाखाली भिंत अस्तित्वात आहे. मात्र या ठिकाणी अक्षरश: फाटलेले, मळलेले इतकेच काय तर हात पुसायलाही कुणी वापरणार नाही इतके कळकट्ट कपडे ठेवून देण्यात आले आहेत. म्हणजे असे कपडे की ज्याचा वापर कुणालाही होणार नाही. वस्तू तर अभावानेच येतात. त्यातही तुटलेले फ्लॉवर पॉट, रंग उडालेल्या फ्रेम, तुटलेली प्लास्टिकची फुले अशा वस्तू अधिक असतात. खरे तर या वस्तूंचा कुणालाही उपयोग होणार नाही अशाच आहेत. खरे तर इतरांना उपयुक्त ठरतील अशा वस्तू जमा होतील, अशी आयोजकांनी अपेक्षा होती. परंतु लोक घरातील अडगळ कमी करण्यासाठी टाकाऊ वस्तू या भिंतीजवळ टाकत आहेत. वास्तविक हा उपक्रम चळवळ म्हणून पुढे येणे अपेक्षित असताना नकारात्मक मानसिकतेमुळे हा उपक्रम अर्ध्यावर सोडून देण्याची नामुष्की ओढावली आहे. (प्रतिनिधी)