नाशिक: बिबट्याची दहशत, नागरिकांमधे घबराट
By Admin | Published: September 13, 2016 11:10 AM2016-09-13T11:10:08+5:302016-09-13T11:10:38+5:30
नांदगाव बुद्रुक येथील ब्रिटिशकालीन पाची पुलाजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले.
>ऑनलाइन लोकमत
बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. १३ - इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दारणा धरणाजवळील नांदगाव बुद्रुक येथील ब्रिटिशकालीन पाची पुलाजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
साकुर फाटा ते अस्वली दरम्यान असलेल्या महामार्ग क्र.37 वरील पाचीपुल भागात दोन ते तीन बिबट्या रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत या महामार्गावर बसलेल्या स्थितीत आढळतात. या वेळेस प्रवास करणाऱ्या व येथील शेतकरी राहिवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाल्याने शेतकरी आता फारच धास्तावले आहेत. वनविभाग मात्र अजूनही सुस्तच आहे. साकुर फाटा ते अस्वली स्टेशन या महामार्ग क्रमांक 37 वर दररोज शेकडो कामगार गोंदे दुमाला येथे कामावर जातात रात्रीच्या सुमारास कामावरून घरी जाताना प्रचंड तणावाखाली वाहने चालवितात. परिसरात वाढलेल्या बिबट्याच्या दहशतीला आळा घालण्यासाठी वनविभागाने तात्काळ पाऊले उचलावी, ज्या ज्या भागात बिबटयांचा मुक्त संचार आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.
या पुलावरून प्रवास करणाऱ्या कामगारांना खूप अंधार असल्याने रात्रीच्या गडद काळोखात रस्ता देखील दिसत नाही. या परिसरात जंगली श्वापदांचा उपद्रव वाढला असून कधी बिबट्या हल्ला करील याची शासवती अजिबात राहिलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी पथदीप बसविण्याची मागणी होत आहे.