धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 01:13 PM2021-06-02T13:13:12+5:302021-06-02T13:13:43+5:30

नाशिकमधील कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने आता कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय नाशिकच्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.

nashik private hospital doctors declare they will not admit any corona patient from tomorrow | धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय?

धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय?

Next

नाशिकमधील कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने आता कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय नाशिकच्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. शहरात सरकारी रुग्णालयांमध्ये कोरेाना बेड उपलब्ध असल्याने खासगी कोविड सेवा आपण बंद करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, यामागे दुसरं कारण असल्याची चर्चा सुरु आहे.

नेमकं कारण काय?
कोरोनाच्या काळात सर्व खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर उपचार केले आहेत. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत आजवर कोरोनावर उपचार करण्यात आले असून, यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. गेल्या दीड वर्षापासून खासगी डॉक्टर्स कोरोना रुग्णसेवा करीत असून डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांवर ताणही आला आहे. त्यांना विश्रांतीची गरज असल्याने कोरोना रुग्णांवर तूर्तास उपचार करणार नसल्याचे खासगी रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोरेाना संसर्ग आता बऱ्यापैकी आटोक्यात आला असून रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बऱ्यापैकी बेड उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रुग्णांना या रुग्णालयांमध्ये उपचार मिळणे शक्य होणार असल्याने यापुढे खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेणार नसल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे. निवेदनावर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, डॉ. सचिन देवरे, डॉ. राज नगरकर, डॉ. समीर अहिरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

महापौरांनी दिला खासगी रुग्णालयांना इशारा
नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी खासगी रुग्णालयांच्या बिलामध्ये तफावत आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. बिलामध्ये तफावत आढळल्यास थेट रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात येईल, असं देखील कुलकर्णी यांनी सांगितले आहे. नाशिकच्या वोकहार्ट रुग्णालयात बिलाचा मुद्दा समोर आल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी चांगलेच आक्रमक झाले होते. वाढीव बिलाबाबत तक्रार असल्यास आता हॉस्पिटल विरोधातील तक्रार थेट महापौरांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. नाशिकमधील अवाजवी बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या विरोधात महापौर आक्रमक झाले होते. त्यात आता रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना दाखल करुन न घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 
 

Web Title: nashik private hospital doctors declare they will not admit any corona patient from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.